मंत्री अब्दुल सत्तार समर्थकांमुळे महायुतीत वादाचे सूर; भाजप मुख्यमंत्र्यांकडे विषय नेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 08:02 PM2024-07-27T20:02:48+5:302024-07-27T20:03:17+5:30

महायुतीमध्ये असताना सत्तार समर्थकांनी माजी खा. इम्तियाज जलील आणि खा. कल्याण काळे यांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये टाकले.

Controversy in Grand Alliance due to Guardian Minister Abdul Sattar Supporters; BJP will take the matter to the Chief Minister | मंत्री अब्दुल सत्तार समर्थकांमुळे महायुतीत वादाचे सूर; भाजप मुख्यमंत्र्यांकडे विषय नेणार

मंत्री अब्दुल सत्तार समर्थकांमुळे महायुतीत वादाचे सूर; भाजप मुख्यमंत्र्यांकडे विषय नेणार

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्रिपदावर अब्दुल सत्तार यांची वर्णी लागल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. परंतु या जल्लोषामुळे महायुतीमध्ये वादाचे सूर छेडले गेले आहेत. सत्तार समर्थकांनी केलेल्या जाहिरातीमध्ये एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे खा. कल्याण काळे यांचे छायाचित्र आहे. ही बाब भाजपच्या जिव्हारी लागली आहे.

महायुतीमध्ये असताना असा प्रकार होणे योग्य नाही. यातून संभ्रमाचा संदेश जनसामान्यांत जात असल्याचे मत भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे. माजी खा. जलील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या विरोधातील उमेदवार होते. तर जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी खा. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार खा. कल्याण काळे उभे होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जलील यांचा पराभव झाला. परंतु जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दानवे यांचा काळे यांनी पराभव केला. दानवेंचा पराभव त्यांच्यासह भाजपच्या जिव्हारी लागला. त्यातूनच दानवे आणि पालकमंत्री सत्तार यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या.

४ जूननंतर आजपर्यंत पाहिले तर दानवे आणि सत्तार यांच्यात वार-पलटवार सुरू आहेत. महायुतीमध्ये असताना सत्तार यांनी युतीधर्म न पाळता काँग्रेसचे काळे यांना मदत केल्याचा आरोप दानवे करीत आहेत. सत्तार यांनी देखील जाहीरपणे मदत केल्याचे सांगून दानवे यांना डिवचले. हा सगळा राजकीय धुरळा पाहिल्यानंतर सत्तार समर्थकांनी जलील आणि काळे यांचे छायाचित्र पालकमंत्रीपदी निवड झाल्याच्या शुभेच्छापर जाहिरातीमध्ये वापरल्यामुळे दानवे यांच्यासह भाजपच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांकडे विषय जाणार.....
महायुतीमध्ये असताना सत्तार समर्थकांनी माजी खा. इम्तियाज जलील आणि खा. कल्याण काळे यांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये टाकले. हा सगळा प्रकार चांगला नाही. तक्रार म्हणून नाही तरीही सगळा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकण्यात येईल. तसेच त्यांच्या समर्थकांनी केलेला खोडसाळपणा निदर्शनास आणून देण्यात येईल. पालकमंत्री सत्तार यांनी समर्थकांना कुणाचे फोटो घ्यावेत, हे सांगणे अपेक्षित होते.
-अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री

Web Title: Controversy in Grand Alliance due to Guardian Minister Abdul Sattar Supporters; BJP will take the matter to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.