‘नीट’शिवाय मेडिकल प्रवेशावर मतमतांतरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:02 AM2021-09-23T04:02:01+5:302021-09-23T04:02:01+5:30
--- औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट’ (नीट) पूर्वपरीक्षा तमिळनाडू सरकारने रद्द करून ...
---
औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट’ (नीट) पूर्वपरीक्षा तमिळनाडू सरकारने रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यावर बोर्डाच्या परीक्षेतून अचूक मूल्यांकन होण्याबद्दल साशंकता व्यक्त करीत तार्किक ज्ञान, क्षमता कशी मोजणार असे सवाल तज्ज्ञ, विद्यार्थ्यांतून उपस्थित केले जात आहेत; तर ‘नीट’च्या तयारीसाठी क्लासेसचा होणारा खर्च टळेल, अकरावी-बारावीकडे दुर्लक्ष होणार नाही, असाही मतप्रवाह आहे.
नीट परीक्षेआधी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने तमिळनाडूतील नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तमिळनाडू विधानसभेत ठराव मंजूर झाला. त्यामुळे बारावी गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले जाणार आहेत, तर शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जागाही राखीव केल्या गेल्या आहेत. नीटची काठिण्यता दिवसेंदिवस वाढत असून ती कमी होण्यावर विचार व्हावा. मात्र, नीट रद्द करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर या निर्णयामुळे ‘नीट’च्या तयारीत विद्यार्थ्यांचे अकरावी-बारावीकडे दुर्लक्ष होते. बारावीच्या शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यांकनाकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधत शासकीय शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही कमी खर्चात वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकण्याला स्थान मिळू शकेल, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.
--
तज्ज्ञ म्हणतात....
पूर्वीची सीईटी परीक्षा पद्धती नीटपेक्षा चांगली होती. नीट परीक्षेची काठिन्यपातळी वाढल्याने विद्यार्थ्यांचा ताणतणाव अधिक वाढला. तो कमी व्हायला पाहिजे. मात्र, कोणतीही पूर्वप्रवेश परीक्षा न घेता वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश देणे सयुक्तिक नाही.
- डॉ. शिराझ बेग, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
----
यापूर्वीही तमिळनाडू राष्ट्रीय प्रवेशप्रक्रियेत सहभागी होत नव्हते. तेथील मुले बाहेर वैद्यकीय शिक्षणाला येत नाहीत. तिथे ते बाहेर राज्यातील मुलांना प्रवेश देत नाही. तमिळनाडूचा निर्णय विद्यार्थिहिताचा वाटत नाही.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार
--
विद्यार्थी म्हणतात....
बोर्डाच्या परीक्षेतून गुणवत्तेचे अचूक मोजमाप होतेच असे नाही, तर नीटसारखी परीक्षा वैद्यकीय क्षेत्रात येणाची पात्रता, क्षमता, तार्किक ज्ञानही मोजण्यास उपयुक्त ठरते. तसे न झाल्यास परिणाम बाहेर पडणाऱ्या डाॅक्टरांवर होईल.
-विशाल मुळे, एमबीबीएस विद्यार्थी
-
बारावीच्या परीक्षेत केवळ रट्टा मारणारेही चांगले गुण मिळवू शकतात. मात्र, नीट परीक्षेत आठवी ते बारावीपर्यंतचा पाया पक्का असावा लागतो. सीबीएसई, एनसीआरटीच्या अभ्यासक्रमही अभ्यासावा लागतो. नीटशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश सयुक्तिक नाही.
- शिवानी पावडे, एमबीबीएस, विद्यार्थिनी