तडजोडीतून वाद मिटविले, वीजग्राहकांचे चेहरे फुलले; लोकअदालतीत ५१ प्रकरणे निकाली
By साहेबराव हिवराळे | Published: September 22, 2023 06:42 PM2023-09-22T18:42:36+5:302023-09-22T18:45:02+5:30
जिल्ह्यातील ५१ वीजग्राहकांनी ८ लाख ७६ हजार ३६५ रुपये रक्कम भरून या लोकअदालतीचा लाभ घेतला.
छत्रपती संभाजीनगर :वीजचोरीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवण्यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने औरंगाबाद व वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात वीजचोरीची ५१ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली.
लोकअदालतीत विद्युत कायदा-२००३ अंतर्गत कलम १३५ अन्वये दाखल वीजचोरी प्रकरणे म. रा. वि. वि. कंपनीच्या नियमानुसार तडजोड करून निकाली काढण्यात आली. जिल्ह्यातील ५१ वीजग्राहकांनी ८ लाख ७६ हजार ३६५ रुपये रक्कम भरून या लोकअदालतीचा लाभ घेतला.
जिल्हा व सत्र न्यायालयात लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश विभा इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या सचिव व्ही. पी. फडणीस, जिल्हा न्यायाधीश डी. एच. केळुसकर, जिल्हा न्यायाधीश एन. एम. जमादार, महावितरणचे कनिष्ठ विधि अधिकारी सुनील पावडे उपस्थित होते.
यांनी घेतला पुढाकार...
महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप विधि अधिकारी किशोरी तळेले, कनिष्ठ विधि अधिकारी सुनील पावडे यांच्यासह उपविभागीय अभियंते, वित्त व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला.