सुविधा कमी अन् असुविधाच वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 11:50 PM2017-08-04T23:50:51+5:302017-08-04T23:50:51+5:30
येथील राजगोपालाचारी उद्यानाचीही दुरवस्था झाली असून, येथील खेळण्याचे साहित्य मोडकळीस आल्याने मुलांना याच साहित्याचा आधार घेऊन आपले मनोरंजन करावे लागत आहे. या उद्यानाचा विकास करण्यासाठी मनपाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानाचीही दुरवस्था झाली असून, येथील खेळण्याचे साहित्य मोडकळीस आल्याने मुलांना याच साहित्याचा आधार घेऊन आपले मनोरंजन करावे लागत आहे. या उद्यानाचा विकास करण्यासाठी मनपाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
परभणी शहरात चार उद्याने विकसित केली होती. त्यापैकी राजगोपालचारी उद्यान हे प्रमुख उद्यान आहे. मात्र या ठिकाणी देखील मोजकेच खेळण्याचे साहित्य उपलब्ध आहे. त्यातीलही अनेक खेळण्या मोडकळीस आल्याने मुलांचा हिरमोड होतो. शहरातील वसमत रस्त्यावर असलेल्या या उद्यानात मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत. मागील काही वर्षांपासून नवीन लॉन टाकली नाही, नव्या खेळण्याही बसविण्यात आल्या नाहीत किंवा नवीन झाडेही येथे लावली नाहीत. त्यामुळे उद्यानाच्या दुरवस्थेत भर पडत आहे. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी मुलांसाठी रेल्वे ट्रॅक उभारुन रेल्वे सुरू केली होती. मात्र हा प्रकल्प अल्पायुषीच ठरला. आता मात्र सहा घसरगुंड्या, दोन झोके, दोन सी-सॉ एवढीच खेळणी या ठिकाणी शिल्लक आहे. (समाप्त)