विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:03 AM2021-06-26T04:03:26+5:302021-06-26T04:03:26+5:30
औरंगाबाद : कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करत शुक्रवारी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारंभ थाटात पार पडला. डॉ. बाबासाहेब ...
औरंगाबाद : कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करत शुक्रवारी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारंभ थाटात पार पडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित हा ऑनलाइन समारंभ झाला. व्यासपीठावर पहिल्या रांगेत कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. राजश्री सूर्यवंशी, तर मागे अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. धनश्री महाजन, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, डॉ. हरिदास विधाते, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. राहुल म्हस्के, डॉ. विलास खंदारे, डॉ. प्रतिभा अहिरे, राजेंद्र मडके आदींची उपस्थिती होती. नाट्यगृहातही काही मोजक्याच मान्यवरांना प्रवेश देण्यात आला होता. कुलगुरु, प्रकुलगुरु, कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक तसेच अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे मान्यवर दीक्षांत मिरवणुकीने व्यासपीठावर पोहोचले. त्यानंतर राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर केला.
त्यानंतर अधिष्ठाता डॉ. वायकर, डॉ. सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे व डॉ. महाजन यांनी कुलपतींकडे आपापल्या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवीचा अनुग्रह करण्याची विनंती केली. कुलपती तथा राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपदेश केला. ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे व उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दीक्षांत समारंभास संबोधित केले. हा कार्यक्रम अत्यंत शिस्तीत पार पडला.
यावेळी ४२२ संशोधकांना पीएच.डी.चे थेट वितरण न करता फक्त त्यांच्या नावांचे वाचन करण्यात आले, तर या दीक्षांत समारंभा निमित्त ८१ हजार ७३६ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. व्यासपीठासमोर मोठ्या पडद्यावर (एलईडी) हा ऑनलाइन कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हमीद खान व डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी केले.