विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २५ जून रोजी निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:02 AM2021-05-29T04:02:11+5:302021-05-29T04:02:11+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाची तारीख अखेर निश्चित करण्यात आली. ६१ वा दीक्षांत समारंभ २५ ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाची तारीख अखेर निश्चित करण्यात आली. ६१ वा दीक्षांत समारंभ २५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला जाणार असून महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे व राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहाणार आहेत. राज्यपालांच्या सूचनेनुसार यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच विद्यापीठांचे दीक्षांत समारंभ ऑनलाईन पद्धतीने घेतले जात आहेत. मागील दोन महिन्यांपासून या समारंभासाठी विद्यापीठाचा परीक्षा विभाग प्रमुख पाहुण्यांच्या शोधात होते. व्यवस्थापन परिषदेत यासाठी तीन नावे पुढे आली होती. त्यांच्यापैकी कोणाकडूनही संमती न मिळाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्याकडे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाण्याची विनंती केली व लगेच त्यांच्याकडून सहमती मिळाली. या समारंभास विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित राहतील. आता या समारंभाच्या तारखेवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे पदव्यांच्या छपाईच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
या समारंभात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ आणि मार्च-एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण केले जाणार आहे. पदव्युत्तर, एम.फिल्. व पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांनी तसेच पदवी अभ्यासक्रमाच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासोबत पदवी मिळण्यासाठी अर्ज केलेला नसेल, त्यांना १० जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज भरून व्यक्तिश: अथवा टपालाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागास साक्षांकित हार्ड कॉपी सादर करावी लागणार आहे.
चौकट........
समारंभानंतर दोन दिवसांनी महाविद्यालयांकडे मिळतील पदव्या
यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना मूल्यमापन व परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले की, हा ऑनलाईन दीक्षांत समारंभ झाल्यानंतर लगेच त्यादिवशी पीएच.डी. व एम.फील. धारकांंना विद्यापीठात पदव्यांचे वितरण केले जाणार जाईल, तर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पदव्या समारंभ झाल्यानंतर दोन दिवसांत संबंधित महाविद्यालयांकडे पाठविण्यात येणार आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग कमी झाला, तर महाविद्यालये समारंभपूर्वक अथवा विद्यार्थ्यांना थेट पदव्यांचे वितरण करु शकतात. त्याबाबत तशा सूचना त्यांना दिल्या जातील.