दीक्षान्त सोहळा : ५९ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी मिळणार पदवी, कुलगुरूंची पत्रकार परिषदेत माहिती
By राम शिनगारे | Published: June 20, 2023 09:12 PM2023-06-20T21:12:15+5:302023-06-20T21:12:33+5:30
राज्यपालांच्या हस्ते दोन संकुलांचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त सोहळ्यात तब्बल ५९ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान केली जाईल. २७ जून रोजी होणाऱ्या सोहळ्याच्या दिवशीच राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दोन इमारतींचेही उद्घाटन होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा २७ जून रोजी नाट्यगृहात आयोजित केला आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस असतील. प्रमुख पाहुण्या म्हणून असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) च्या महासचिव डॉ. पंकज मित्तल उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, परीक्षा मंडळ संचालक डॉ. भारती गवळी, प्रसिद्धी समितीचे डॉ. कैलास पाथ्रीकर, उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा, संजय शिंदे यांची उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचा हा दीक्षान्त सोहळा असणार आहे. यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ व मार्च-एप्रिल २०२२ या परीक्षेतील पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला संवैधानिक अधिकारी, अधिष्ठात्यांसह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोहळ्याची तयारी २५ समित्या करीत आहेत.
दोन संकुलांचे होणार उद्घाटन
कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते नामांकित ‘पॉल हर्बट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग ॲण्ड बायोडायव्हिसिटी’ आणि ‘व्होकेशनल स्टडीज’ या दोन अत्याधुनिक संकुलांचे उद्घाटन दीक्षान्त सोहळ्यानंतर होणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या विविध संस्थांनी ६ कोटी ६१ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याशिवाय डीएनए बारकोडिंग इमारतीमध्ये महासंगणकाचेही उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होईल.
पदव्युत्तर महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धाेरण
यावेळी कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, राज्य शासनाच्या आदेशानुसार विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबतच महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना नवीन शैक्षणिक धोरण या वर्षीपासून लागू केले जाणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतील प्राचार्यांच्या बैठकाही घेतल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
या विद्यार्थ्यांना मिळणार पदवी
अभ्यासक्रम..................... विद्यार्थी
पीएच.डी.........................२९१
एम.फिल.........................३२
पदव्युत्तर.........................३१३२०
पदवी............................२८३२३
एकूण..............................५९,९६६