औरंगाबाद-पुणे मार्गावर लवकरच धावणार कुलकॅब टॅक्सी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 06:22 PM2018-10-24T18:22:50+5:302018-10-24T18:23:34+5:30
औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या मार्गावर कुलकॅब टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ५० कुलकॅब टॅक्सीची संख्या निश्चित करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी दिली.
औरंगाबाद विमानतळ कुलकॅब टॅक्सी संघटनेने औरंगाबाद-पुणे आणि पुणे-औरंगाबाद मार्गावर प्रवासी वाहतुकीची परवानगी मागितली होती. या मागणीचा विचार करून या मार्गावर प्रवाशांना पर्यायी सुविधा होण्यासाठी आणि अवैध पद्धतीने होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला प्रतिबंध लावण्यासाठी कुलकॅब संवर्गात नोंद होणाऱ्या कुलकॅब टॅक्सीला प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्याचा प्रस्ताव औरंगाबाद प्रादेशिक प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता.
प्राधिकरणाने याबाबत गुण आणि दोष तपासून या मार्गावर काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून कुलकॅब टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद आणि पुणे प्राधिकरण या मार्गावर थांबा ठरवतील. औरंगाबाद-पुणे मार्गासाठी ५० कुलकॅब टॅक्सीची संख्या निश्चित करण्यात आली आहे. औरंगाबादहून नोकरी, शिक्षणासाठी पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सुटीच्या दिवशी औरंगाबादला येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसबरोबर आता लवकरच त्यांना कुलकॅब टॅक्सीची सेवा मिळणार आहे.
टप्पा वाहतुकीस मनाई
या मार्गावर मध्येच कोणत्याही ठिकाणी टप्पा वाहतुकीप्रमाणे टॅक्सी थांबवून इतर प्रवासी घेता येणार नाहीत. प्रति प्रवासी ५०० रुपये भाडे राहील. वातानुकूलित यंत्रणा वापरावयाची नसल्यास भाड्यातून १० टक्के रक्कम वजा केली जाईल. या योजनेसंदर्भात प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्यांना ३० दिवसांच्या आत आरटीओ कार्यालयात हरकती, आक्षेप सादर करता येणार आहेत. हरकती, सूचनांची पूर्तता झाल्यानंतरच ही सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.