कूलींच्या आयुष्याची गाडी ट्रॅकबाहेर; चाकाची बॅग, लिफ्ट, सरकत्या जिन्यानंतर आता कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 02:38 PM2020-11-05T14:38:00+5:302020-11-05T14:46:35+5:30
लॉकडाऊनच्या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. त्यामुळे काही दिवस काढता आले.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : महानायक अमिताभ बच्चन यांचा कूली चित्रपट आणि त्यातील ‘सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं’ या गाण्यातून प्रवाशांच्या ओझ्याने आयुष्याची गाडी ओढणाऱ्या कूलींचे प्रश्न जगासमोर आले. पुढे गोविंदाच्या ‘कूली नंबर वन’ चित्रपटातूही मनोरंजनात्मक पद्धतीने कूलींची अवस्था मांडण्यात आली.
चित्रपट हीट झाले; पण कूलींचे प्रश्न तसेच राहिले. कोरोनामुळे आता तर त्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे. रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षा, चारचाकीतून प्रवासी उतरतात, तेव्हा लाल रंगाचा शर्ट परिधान केलेले कूली आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे पाहतात. ‘ए कूली... ए कूली...’ अशी हाक एखादा प्रवासी मारेल, याकडे त्यांचे कान असतात; परंतु प्रवासी कूलींकडे दुर्लक्ष करतात, कोणी जवळ आले तर सरळ दूर करतात. चाकाची सुटकेस, बॅग ओढत रेल्वेस्टेशनमधून रवाना होतात.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या असेच दृश्य पाहायला मिळते आहे. प्रवासात कमी सामान घेऊन जाण्याचा वाढलेला कल, हँडल-चाकाच्या सुटकेस, बॅगमुळे ओझे कमी झाले. त्याचा फटका बसला तो कूलींनाच. रेल्वेस्टेशनवर काही वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्मवर लिफ्ट, सरकत्या जिन्यांची सुविधा करण्यात आली. या सुविधांनी कूलींच्या बेरोजगारीचे संकट गडद झाले. त्यात आता कोरोनाची भर पडली आहे. कोरोनामुळे औरंगाबादेत अवघ्या ८ रेल्वे दिवसभरात ये-जा करीत आहेत. रेल्वेस्टेशनवर सध्या १४ कूली आहेत; परंतु एकालाही दिवसभरात दोन वेळच्या जेवणाएवढेही पैसे मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न या कूलींपुढे उभा राहिला आहे. रेल्वे प्रशासन आणि ज्यांनी कूलींच्या अभिनयातून स्वतःचे विश्व उभे केले, किमान ते तरी कूलींच्या मदतीसाठी येतील का, असा प्रश्न या कूलींना पडतो आहे. जगायचे कसे, हा प्रश्न कूली शेख रफिक म्हणाले, कोरोनामुळे रेल्वे बंद केल्या. कूली कसे जगतील, याचा कोणी विचारही केला नाही. तरीही कसे तरी दिवस काढले; पण आता तर भीतीने प्रवासी जवळही येऊ देत नाहीत.
लॉकडाऊनमध्ये सामाजिक संस्थांची मदत
लॉकडाऊनच्या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. त्यामुळे काही दिवस काढता आले. एक-एक दिवस कसे काढले, हे सांगताही येत नाही. आताही रेल्वेंची वाहतूक पूर्ववत नसल्याने रेल्वेस्टेशनवर कामच उरले नाही. त्यामुळे सिमेंटच्या गोण्या उतरविण्यासह मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत आहे.
-राहुल दुसिंग, कुली