ऑरिक सभागृहात ‘झेडपी’ची समन्वय सभा; सभेत अधिकारी-कर्मचाऱ्यांना कानपिचक्या
By विजय सरवदे | Published: October 13, 2023 12:15 PM2023-10-13T12:15:33+5:302023-10-13T12:15:47+5:30
वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना ‘सीईओ’ मीना यांनी दिल्या.
छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील ऑरिक सभागृहात गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्हा परिषदेची समन्वय सभा घेतली. या सभेत त्यांनी घरकुल व रोजगार हमी या योजनांचा विस्तृत आढावा घेऊन कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. याशिवाय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी जिल्हास्तरावरील आणि तालुकास्तरावरील विभागप्रमुखांनी समन्वय ठेवून गतीने कामे करावीत, अशा सूचना दिल्या, तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी ग्रामस्तरावर प्रत्यक्ष लाभार्थ्यांची भेट घेऊन योजनांची पूर्तता करावी, असे आवाहन केले.
जिल्हा व तालुकास्तरावरील नोडल अधिकाऱ्यांनी कामाचे नियोजन करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे म्हणाले. समन्वय सभेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ओमप्रकाश रामावत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) सुवर्णा जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो) अनुपमा नंदनवनकर, शिक्षणाधिकारी (नियोजन) अरुणा भुमकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता नंदकुमार अपसिंगेकर, सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता, विस्तार अधिकारी (पंचायत), शाखा अभियंता, मग्ररोहयोचे कार्यक्रमाधिकारी, सहाययक कार्यक्रमाधिकारी उपस्थित होते.
योजनांच्या उद्दिष्टांची पूर्तता करा
समन्वय सभेत पंतप्रधान आवास योजना, रमाई, शबरी, अटल कामगार, घरकुल, मग्रारोहयो, पंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, जल जीवन मिशन, पाणी गुणवत्ता पाणीटंचाई, स्वच्छ भारत मिशन, कृषी, आरोग्य विभागाचा आढावा घेऊन या वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना ‘सीईओ’ मीना यांनी दिल्या. ग्राम पातळीवर होणाऱ्या कामांचे तालुका स्तरावरून नियमित रिपोर्टिंग व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.