‘ड्राय रन’ला कॉपी, खरी परीक्षा प्रत्यक्ष लसीकरणातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:02 AM2021-01-09T04:02:11+5:302021-01-09T04:02:11+5:30
औरंगाबाद : कुणाला लसीकरणासाठी येण्याची वेळच माहीत नाही, कोणाला लस न देताच थेट लसीकरण झाल्याची नोंद, तर लस ...
औरंगाबाद : कुणाला लसीकरणासाठी येण्याची वेळच माहीत नाही, कोणाला लस न देताच थेट लसीकरण झाल्याची नोंद, तर लस घेतल्यानंतर निरीक्षण कक्षात ३० मिनिटे थांबण्याऐवजी १० मिनिटांतच गायब, शेवटचे १५ मिनिट शिल्लक राहिले म्हणून लसीकरणाची घाई आणि विशेष म्हणजे लस घेणारे तेच, देणारेही तेच. ही परिस्थिती शुक्रवारी मनपा आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाच्या ‘ड्राय रन’ (रंगीत तालीम) प्रसंगी पाहायला मिळाली. त्यामुळे ‘ड्राय रन’ला कॉपी झाली असली तरी प्रत्यक्ष लसीकरणावेळीच आरोग्य यंत्रणेची खरी परीक्षा होणार आहे.
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लवकरच लसीकरण सुरू होणार आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात ड्राय रन घेण्यात आले. शहरात सिडको, एन-११ येथील मनपा आरोग्य केंद्रात हा ड्राय रन घेण्यात आला. आरोग्य केंद्रावर २५ लाभार्थ्यांना बोलविण्यात आले होते. प्रतीक्षा कक्षात पडताळणी यादीतील लाभार्थ्यांना प्रवेश, त्यानंतर लसीकरण कक्षात को-विन पोर्टलवर नोंद करून लाभार्थ्याला लस देण्याचे प्रात्यक्षिक केले जात होते. शेवटी निरीक्षण कक्षात लसीकरणानंतर लाभार्थ्याला ३० मिनिटे निरीक्षणासाठी थांबविले जात होते.
सर्वप्रथम अशा वर्कर अरुणा मिसाळ यांची लस टोचणीव्यतिरिक्त लसीकरणाची रंगीत तालीम झाली. त्यानंतर आरोग्य कर्मचारी दगडू हरणे यांना लस देण्याचे प्रात्यक्षिक झाले. मात्र, या दोन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणानंतर रंगीत तालमीची अवस्था समोर आली. ड्राय रनची वेळ सकाळी ९ ते ११ होती. सकाळी १०.४५ वाजेपर्यंत १४ कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे प्रात्यक्षिक झाले होते. त्यानंतर ११ वाजेपर्यंत ही प्रक्रिया संपवायची म्हणून प्रात्यक्षिकात शॉर्टकट मारून लसीकरणाचे प्रात्यक्षिक करून मोकळे होत होते. जे कर्मचारी ही सगळी प्रक्रिया पार पाडत होते, तेच लस घेणारे होते. काहींनाच लसीकरण झाल्याचा मेसेज आला. लस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्स महत्त्व सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात अधिकाऱ्यांसोबत छायाचित्र घेताना सर्वांनाच सोशल डिस्टन्सचा विसर पडला होता.
‘ड्राय रन’प्रसंगी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, डॉ. मेगा जोगदंड, डॉ. रवी सावरे, डॉ. राजू गुंजाळ, आरोग्य पर्यवेक्षक आर. एल. गजभारे, आदी उपस्थित होते.