मागील पाच परीक्षांमध्ये कॉपीचा गैरप्रकार; २०५ परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांची अदलाबदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 20:12 IST2025-02-07T20:11:43+5:302025-02-07T20:12:10+5:30

विभागीय मंडळांकडून गोपनीय साहित्याचे वाटप : केंद्रप्रमुखांना दिल्या सूचना

Copying irregularities in the last five exams; Teachers replaced at 205 exam centers | मागील पाच परीक्षांमध्ये कॉपीचा गैरप्रकार; २०५ परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांची अदलाबदली

मागील पाच परीक्षांमध्ये कॉपीचा गैरप्रकार; २०५ परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांची अदलाबदली

छत्रपती संभाजीनगर : मागील पाच परीक्षांमध्ये कॉपीचा गैरप्रकार उघडकीस आलेल्या विभागातील २०५ केंद्रांमधील केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांसह परीक्षेशी संबंधित कामकाज करणाऱ्या शिक्षकांसह इतरांची अदलाबदल करण्याचे आदेश विभागीय मंडळाने दिले. त्यानुसार नव्याने नियुक्त झालेल्या पाच जिल्ह्यांतील केंद्रप्रमुखांकडे स. भु. शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात गुरुवारी (दि. ६) दिवसभर परीक्षेचे गोपनीय साहित्य सुपूर्द केल्याची माहिती विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठीची छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांमधील तयारी पूर्ण झाली आहे. शालेय शिक्षण विभागाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी ज्या शाळेतील विद्यार्थी केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, त्याठिकाणी संबंधित शाळेतील कोणताही व्यक्ती परीक्षेसाठी थांबणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यभरातून त्याला विरोध होऊ लागल्यामुळे शिक्षण विभागाने मागील पाच परीक्षांमध्ये ज्या केंद्रांवर किमान एक गैरप्रकार झालेला असेल तर त्याठिकाणच्या शिक्षकांच्या अदलाबदलीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार विभागातील पाच जिल्ह्यांतील एकूण २०५ केंद्रांवर त्याच शाळेतील शिक्षक परीक्षेशी संबंधित कामकाजासाठी असणार नाहीत, असेही विभागीय सचिव जामदार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ४६० परीक्षा केंद्र असणार आहेत. त्यातील २०५ केंद्रांवर शिक्षकांची अदलाबदली केली आहे.

परीक्षा केंद्रातील शिक्षकांची अदलाबदल
जिल्हा...........................परीक्षा केंद्र
छ.संभाजीनगर..................५६
बीड..................................५१
परभणी.............................३७
जालना..............................३७
हिंगोली...............................२४
एकूण................................२०५
-------------------------------------------

बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी
जिल्हा...........................परीक्षा केंद्र..........................विद्यार्थी
छ.संभाजीनगर..................१६१..................................६३,९१८
बीड..................................१०६.................................४३,७५६
परभणी.............................७१....................................२७,२३०
जालना..............................८२.....................................३६,१६६
हिंगोली...............................४०...................................१४,२६०
एकूण................................४६०....................................१,८५,३३०

केंद्र संचालकांना दिलेल्या सूचना 
- गैरमार्गाचे प्रकरण आढळल्यास पुढील वर्षीपासून केंद्र मान्यता कायमस्वरूपी रद्द होणार.
- खासगी क्लासेस व इतर कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात येऊ नये.
- परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार करावी.
- केंद्रात विद्यार्थ्यांना तपासूनच सोडावे. त्यांच्याकडील असलेले साहित्य इमारतीबाहेरच काढून घ्यावे.
- केंद्रात फक्त केंद्र संचालक व सहाय्यक परिरक्षक यांचाच मोबाईल सुरू राहील. उर्वरित सर्वांचे मोबाईल बंद असतील.
- केंद्रावर गैरप्रकार घडल्यास केंद्र संचालकाने तत्काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी व मंडळाला कळवावे.
- विद्यार्थी, जमिनीवर, मंडपात, एका बाकावर दोन बसणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

गोपनीय साहित्याचेही वाटप
बारावीच्या परीक्षेची संपूर्ण तयारी झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दक्षता समिती, केंद्र संचालकांसोबत सतत बैठका सुरू आहेत. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. विभागीय मंडळानेही सर्व तांत्रिक बाबी तपासून घेतल्या असून, केंद्र संचालकांपासून इतरांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. गोपनीय साहित्याचेही वाटप करण्यात आले आहे.
- वैशाली जामदार, सचिव, विभागीय मंडळ

Web Title: Copying irregularities in the last five exams; Teachers replaced at 205 exam centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.