‘कोरोना’चा मिरचीवर परिणाम; भाव ४ हजार रुपयांनी घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 08:10 PM2020-02-14T20:10:15+5:302020-02-14T20:14:22+5:30
उच्चांक गाठून भाव ४ हजार रुपयांनी घसरले
औरंगाबाद : मागील वर्षी ऐन लाल मिरची काढणीच्या वेळेस पडलेल्या अतिवृष्टीमुळे देशात मिरचीचे उत्पादन घटले आणि मिर्चीच्या भावाचा भडका उडाला. तब्बल क्विंटलमागे १३ हजार रुपयांनी मिरची वधारून २२ हजार रुपये क्विंटलपर्यंत उच्चांकी भावात विक्री झाली होती. मात्र, मिरचीची आयात करणारा प्रमुख देश चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने तेथून मागणी घटली आणि निर्यात थंडावली. परिणामी, क्विंटलमागे मिरचीचे भाव २ हजार ते ४ हजार रुपयांनी गडगडले. आजघडीला बाजारात गुंटूर मिरची १७ हजार ते १८ हजार रुपये क्विंटलने विकते आहे.
जगात लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. मिरची निर्यातीतील प्रमुख देश म्हणून भारत ओळखला जातो. देशात आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र राज्यात लाल मिरचीचे मोठे उत्पादन होते. त्यातही आंध्र प्रदेशात देशात सर्वाधिक मिरचीचे उत्पादन होते. मागील खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात सर्वच राज्यांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका मिरची उत्पादनाला बसला.
मिरचीचे होलसेल विक्रेते मुकेश गुळवे यांनी सांगितले की, दरवर्षी देशात जानेवारीमध्ये लाल मिरचीचा २५ लाख पोती जुना साठा असतो. मात्र, यंदा हा साठा संपला आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व त्यात निर्यात वाढल्याने मागील वर्षी विक्री होणारी गुंटूर लाल मिरची ७ हजार ते ९,५०० हून वाढत तीन महिन्यात थेट २० हजार ते २२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचली. लवंगी (तेजा) मिरचीचे भाव १८ हजार ते १९ हजार रुपये, तर ब्याडगीचे भाव २० हजार ते २० हजार १०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले होते. मागील ५ वर्षांतील भाववाढीचा हा उच्चांक ठरला होता; पण चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने तेथून मागणी व निर्यातीही घटली. मागील आठवडाभरात ४ हजार रुपयांनी भाव कमी होऊन गुंटूर मिरची १७ हजार ते १८ हजार रुपये, लवंगी मिरची हजार रुपयांनी घटून १७ हजार रुपये ते १८ हजार रुपये, तर ब्याडगी मिरची १९ हजार ते २० हजार १०० रुपये प्रतिक्विंटल सध्या विकत आहे. स्थानिक बाजारात होलसेलमध्ये सध्या १७० ते २२० रुपये किलोपर्यंत विकत आहे. किरकोळ विक्रीत गुंटूर मिरची २०० रुपये किलोने मिळत आहे. नवीन लाल मिरचीचे वजन घटते. यामुळे किरकोळ विक्रेते सध्या मिरची खरेदी करून ठेवण्याचे धाडस करीत नाहीत. १५ दिवसांनी किरकोळ विक्रेत्यांकडे मिरचीचे सर्व प्रकार उपलब्ध होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
गत वर्षीच्या तुलनेत मिरची महागच
होलसेलमध्ये मागील वर्षी ७० ते ११० रुपये किलोने लाल मिरची विकली गेली होती. सध्या १७० ते २२० रुपये किलोपर्यंत विकत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मिरची महागच आहे.
वार्षिक खरेदीदारांची प्रतीक्षा
घरगुती मिरची वार्षिक खरेदीचा हंगाम जानेवारी ते मे महिन्यादरम्यान असतो. सध्या मिरचीचे भाव गगनाला भिडले असल्याने. ‘थांबा व प्रतीक्षा करा’ असे धोरण ग्राहकांनी अवलंबले आहे.यामुळे फेब्रुवारी सुरू होऊनही स्थानिक बाजारात मिरचीला उठाव नाही. घरगुती ग्राहक आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील लाल मिरची जास्त पसंत करतात. ही मिरची कमी तिखट असते. खम्मम परिसरात उत्पादित लवंगी लाल मिरची जास्त तिखट असते. ही मिरची घरगुती ग्राहक खरेदी करतात, तर कर्नाटकातील ब्याडगी मिरची दिसण्यास लाल भडक; पण तिखट नसते. ही मिरची हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.