व्यापाऱ्यांना कोविड टेस्ट सक्तीची; निगेटिव्ह प्रमाणपत्र असणाऱ्यांना दुकान उघडण्याची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:16 PM2020-07-18T19:16:57+5:302020-07-18T19:18:22+5:30
भाजीपाला, फळ, दूध, मांस विक्रेते आणि किराणा दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना रविवारपूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी घेतला. भाजीपाला, फळ, दूध, मांस विक्रेते आणि किराणा दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना रविवारपूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल, त्यालाच रविवारपासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
व्यापाऱ्यांच्या तपासणीसाठी पथके
१ जिल्हा व्यापारी महासंघ, भाजीपाला विक्रेत्यांच्या संघटना आणि इतर व्यापाऱ्यांशी समन्वय साधून महापालिकेने शनिवारपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांत तब्बल पंधरा मोबाईल टीम तपासणीसाठी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
२ निगेटिव्ह आलेल्या व्यापाऱ्याला जागेवरच कोविड-१९ निगेटिव्ह, असे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन टीम तैनात राहतील.
३ पहिल्या टप्प्यात ज्या व्यापाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यांनी तपासणी करून घ्यावी, मगच दुकान उघडावे, असे आवाहन पाण्डेय यांनी केले.
दुसऱ्या टप्प्यात सर्व व्यापाऱ्यांचा समावेश
मेडिकल दुकानदार, पंक्चर दुकानदार यांच्यासह सर्व व्यापाऱ्यांना २५ ते ३१ जुलैपर्यंत कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक राहणार आहे. शहरात व्यापक प्रमाणात तपासणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यात जास्तीत जास्त नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तपासणी करून घ्यावी, असेही प्रशासकांनी नमूद केले.
चारशे कर्मचाऱ्यांची टीम
सध्या संचारबंदीत पोलिसांसोबत प्रत्येक पॉइंटवर काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तपासणीसाठी नेमण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या टीमसोबत हे कर्मचारी मदतनीस म्हणून काम करतील. अनेक ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात
भाजीपाला, फळ, दूध, मांस विक्रीची दुकाने, किराणा दुकानदार यांना बंधनकारक.
दुसऱ्या टप्प्यात
मेडिकल, पंक्चर दुकानचालक आदी सर्व व्यापाऱ्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक.
१० जुलैपासून महापालिकेने नागरिकांच्या अधिक सोयीसाठी अत्याधुनिक अँटिजन टेस्टला सुरुवात केली आहे. मागील आठ दिवसांपासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्यावर भर देत आहे. ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्या भागात पूर्वीप्रमाणेच व्यापक प्रमाणात अँटिजन टेस्ट करण्याचे काम सुरू राहणार आहे.
शनिवारी रात्री १२ वाजता
रविवारपासून शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्दी होईल म्हणून महापालिका प्रशासनाने शुक्रवारी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. याची माहिती देताना प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले की, रविवारी ज्या व्यापाऱ्यांकडे कोरोना टेस्ट केलेले निगेटिव्हचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येईल.
औरंगाबादकरांचे आरोग्य आता त्यांच्याच हाती
शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. ४ज्या व्यापाऱ्याकडे कोरोना टेस्ट केलेले प्रमाणपत्र नसेल त्याच्याकडून कोणतेही सामान खरेदी करण्यात येऊ नये, असे आवाहन औरंगाबादकरांना प्रशासक पाण्डेय यांनी केले.