पर्यटनाची शाही रेल्वे डेक्कन ओडिसीच्या प्रवासाला कोरोनाचा ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 06:13 PM2020-11-04T18:13:06+5:302020-11-04T18:17:24+5:30
एकट्या औरंगाबादेत दरवर्षी किमान २२ डेक्कन ओडिसी दाखल होत असतात.
औरंगाबाद : राजेशाही थाट... पंचतारांकित सोयी- सुविधा, अशा भव्यतेने नटलेल्या डेक्कन ओडिसीच्या प्रवासाला यंदा कोरोनामुळे ‘ब्रेक’ लागला आहे. दरवर्षी सप्टेंबरपासून ही औरंगाबादेत दाखल होत असे. मात्र, प्रथमच यावर्षी या रेल्वेचा प्रवास थांबला आहे.
दरवर्षी सप्टेंबर ते मे हा डेक्कन ओडिसीचा हंगाम मानला जातो. या ‘पॅलेस ऑन व्हिल रेल्वे’तून दरवर्षी देश-विदेशांतील पर्यटक मुंबई, औरंगाबाद, नागपूर यासह राज्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देतात. या रेल्वेतून युरोपियन, अमेरिकन, जपानी, तसेच अन्य अनेक देशांतील पर्यटकांनी देशातील विविध स्थळांना आतापर्यंत भेट दिली आहे. एकट्या औरंगाबादेत दरवर्षी किमान २२ डेक्कन ओडिसी दाखल होत असतात. त्यातून १,४०० ते १,५०० पर्यटक जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि शहरातील बीबी का मकबरा या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत. मात्र, यावर्षी या रेल्वेला कोरोनामुळे रेड सिग्नल लागला आहे. हिरवा सिग्नल कधी पडणार हे अनिश्चित आहे.
लाखोंचा व्यवसाय ठप्प
डेक्कन ओडिसीने पर्यटक औरंगाबादेत आल्यानंतर प्रर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी बस, चारचाकी वाहनांचा वापर होतो. यातून वाहतूकदार, चालक, क्लीनर, गाईड यांना रोजगार मिळतो. शिवाय वेरूळ, बीबी का मकबरा येथे पर्यटक विविध वस्तूंची खरेदी करतात. अनेकदा हे पर्यटक पंचातारांकीत हॉटेलमधून जेवनही घेतात. शहरात फिरतात. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल होते; परंतु ही उलाढालच सध्या ठप्प झाली आहे.
युरोपात लॉकडाऊन, परदेशी पर्यटक येतील कसे?
एक डेक्कन ओडिसी आल्याने अनेकांना रोजगार मिळत होता; परंतु कोरोनामुळे हंगाम सुरू होऊनही ही रेल्वे दाखल होऊ शकत नाही. त्याचा अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. युरोपियन देश सध्या लॉकडाऊनमध्ये आहेत. त्यामुळे ही रेल्वे कधी सुरू होईल, हे सांगणे अवघड आहे.
- जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन