कोरोना काळजी; औरंगाबाद जिल्ह्यात २०० हून अधिक मंगल कार्यालयांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 07:35 PM2021-02-17T19:35:10+5:302021-02-17T19:36:22+5:30
corona virus in Aurangabad प्रवासी व माल वाहतूक, खासगी वाहनांचे स्क्रिनिंग करण्यासाठी गुरुवारी पोलीस प्रशासनासोबत बैठक होणार
औरंगाबाद: कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणांची चिंता वाढली असून नागरिक मात्र कोरोना संपला या आविर्भावातच आलबेल वागू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने बुधवारी तहसीलस्तरावरील २०० हून अधिक मंगल कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत.
विदर्भातून आणि केरळ व दक्षिण भारतासह कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत असलेल्या राज्य आणि जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रवासी व माल वाहतूक, खासगी वाहनांचे स्क्रिनिंग करण्यासाठी गुरुवारी पोलीस प्रशासनासोबत बैठक होणार आहे. त्या बैठकीत जिल्हा सीमा तपासणी (चेकपोस्ट) अलर्ट करण्याचा निर्णय होणार आहे. केरळमधून येणाऱ्या वाहनांची सध्या तपासणी सुरू आहे. अकोला आणि अमरावतीमधून औरंगाबादमार्गे अनेक वाहने मुंबई व नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात जात आहेत. त्या वाहनांचे स्क्रिनिंग आता करण्यात येणार आहे.
प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशी
प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले, जिल्ह्यात सर्व मंगल कार्यालयांना तहसील पातळीवर नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. वेळप्रसंगी प्रशासन गुन्हे दाखल करण्यापर्यंत जाईल. गर्दीच्या ठिकाणी नियम कडक करण्यात येणार आहेत. मास्क आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. जिल्हा सीमा तपासणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेसोबत गुरुवारी बैठक होणार आहे.
एसटीसह सर्व यंत्रणेला सूचना
विदर्भासह सर्व जिल्ह्यातून औरंगाबादेत येणाऱ्या एस. टी. बसमधील प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना प्रवासाची परवानगी देण्याबाबत सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर परिपत्रक काढून अलर्ट देण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी सांगितले.