औरंगाबाद जिल्ह्यात ५ महिन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये कोरोना मृत्यूत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:45 PM2020-12-08T16:45:54+5:302020-12-08T16:50:57+5:30
corona virus death जिल्ह्यात ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला बळी ठरला होता.
औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल ५ महिन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूत मोठी घट झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. दर महिन्याला दोनशेवर मृत्यू होत होते; परंतु नोव्हेंबरमध्ये केवळ ७६ रुग्णांचा मृत्यू झाला. गंभीर रुग्णांची संख्या घटल्याने मृत्यूची संख्या तिहेरीवरून दुहेरी आकड्यात आली आहे.
जिल्ह्यात ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला बळी ठरला होता. त्यानंतर १३ मेपासून कोरोनामुळे प्रत्येक दिवस घातवार ठरत गेला. या दिवसापासून जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत होता. अनेक उपायोजना करूनही मृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत होती; परंतु तब्बल ६ महिन्यांनंतर पहिल्यांदा ८ नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या मृत्यूसत्राला ब्रेक लागला. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजीही जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही. ऑक्टोबरपासून नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत गेली. गंभीर रुग्णांची संख्याही कमी झाली. त्यामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णंसंख्येतही मोठी घट झाली.
धोका कायम, नियम पाळा
कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. रुग्णसंख्या ही कमी-अधिक होईल; पण मास्क, सोशल डिस्टन्स, हात स्वच्छ धुणे या बाबींचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. शहरात अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळते; परंतु नागरिकांनी विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक
जिल्ह्यातील कोरोना मृत्यू
कालावधी एकूण मृत्यू
५ एप्रिल ते १२ मे १७
१३ मे ते ३० जून २४६
१ ते ३१ जुलै २०६
१ ते ३१ ऑगस्ट २३०
१ ते ३० सप्टेंबर २३९
१ ते ३१ ऑक्टोबर १३४
१ ते ३० नोव्हेंबर ७६
१ ते ६ डिसेंबर १०