गंगापुरात कोरोना आटोक्यात, मात्र मृत्यूची संख्या चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:05 AM2021-07-03T04:05:11+5:302021-07-03T04:05:11+5:30

जयेश निरपळ गंगापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगापूर तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात झपाट्याने रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

Corona detained in Gangapur, but death toll alarming | गंगापुरात कोरोना आटोक्यात, मात्र मृत्यूची संख्या चिंताजनक

गंगापुरात कोरोना आटोक्यात, मात्र मृत्यूची संख्या चिंताजनक

googlenewsNext

जयेश निरपळ

गंगापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगापूर तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात झपाट्याने रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र जून महिन्यात रुग्ण वाढीचा वेग कमालीचा मंदावला आहे, मात्र मृत्यूची आकडेवारी चिंताजनक आहे.

तालुक्यात कोरोनाने घट्ट विळखा घातल्याने पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर वेगाने फैलावली. यामुळे शहरासह ग्रामीण भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यात एकूण ४ हजार ८७१ रुग्ण सापडले. पैकी २ हजार ३४६ म्हणजे ४८ टक्के रुग्ण फक्त एप्रिल महिन्यात आढळले होते. २३ एप्रिल रोजी एकाच दिवशी सर्वाधिक २०१ रुग्ण सापडल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली होती. एप्रिलमध्ये सर्वाधिक ६६ जणांचा कोरोनाने बळी गेला. मे च्या मध्यापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता होता १ ते १८ मे दरम्यान १ हजार १७० रुग्ण सापडले, नंतर मात्र १९ ते ३१ मे दरम्यान केवळ २९८ रुग्ण सापडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. या दरम्यान मृत्यूसंख्या निम्म्याने कमी झाली असली, तरी चिंताजनक होती. जून महिन्यात केवळ २३२ रुग्ण आढळून आले. यामध्ये पहिल्या १५ दिवसांत केवळ ७४ रुग्णवाढ झाली. मात्र २२ जणांचा कोरोनाने जीव गेला. फेब्रुवारी ते जून या १५० दिवसांत १४५ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. एप्रिल अखेर कोरोनाने १४४ गावांना आपल्या विळख्यात घेतले. तर मे मध्ये २३ नवीन गावांची त्यात भर पडली. दिलासादायक म्हणजे जूनमध्ये एकाही नवीन गावात कोरोनाला शिरकाव करता आला नाही.

चौकट

दुसऱ्या लाटेत तालुक्यात १४५ जणांचा मृत्यू

तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकूण ४ हजार ८७१ रुग्ण सापडले असून पैकी ४ हजार ६४१ रुग्ण बरे झाले. सध्या ८५ जण उपचार घेत असून १४५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.९ टक्के एवढे आहे. तर रुग्ण सापडण्याचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

Web Title: Corona detained in Gangapur, but death toll alarming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.