कोरोना गेला नाही, बिनधास्त कसे राहता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:02 AM2021-06-27T04:02:22+5:302021-06-27T04:02:22+5:30
खुलताबाद : भद्रा मारुती मंदिराच्या परिसरातील दुकानदारांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे पाहून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर दुकानदारांवर ...
खुलताबाद : भद्रा मारुती मंदिराच्या परिसरातील दुकानदारांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे पाहून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर दुकानदारांवर भडकले. मास्क न घातलेल्या नारळ विक्रेत्यांना त्यांनी कोरोना गेला नाही, बिनधास्त कसे राहता, असे खडेबोल सुनावले. संतप्त झालेल्या आयुक्तांनी जिल्हाधिकारी, तहसीलदारांना फोन लावून तात्काळ संबंधितांवर कारवाई करून दुकानदारांना शिस्त लावण्याचे आदेश दिले. आयुक्तांनी कान टोचल्यानंतर काही वेळातच तालुका प्रशासनाच्या पथकाने दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली.
सध्या मंदिर बंद जरी असले तरी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी शनिवारी मंदिराच्या बाहेरून दर्शन घेतले. शनिवार असल्याने मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यादरम्यान दुकानदारांचा गलथान कारभार त्यांना दिसून आला. दुकानदारांसह अनेक भाविक मास्क व सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र होते. परिस्थितीचे गांर्भीर्य पाहता त्यांनी दुकानदारांना चांगलेच खडसावले. यानंतर जिल्हाधिकारी, तहसीलदारांना ग्राउंड लेव्हलवर काम करत नियमांचे पालन होत नसेल तर संबंधितांवर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले.
---
काही वेळातच तहसीलचे पथक हजर
विभागीय आयुक्तांनी फोन करताच तहसीलचे पथक काही वेळातच भद्रा मारोती मंदीर परिसरात दाखल झाले. त्यांनी कारवाई करून दुकानदारांसह विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा कागावा केला. यात २७ जणांनी मास्क वापरले नसल्यामुळे त्यांच्याकडून ४ हजार २५० रुपयांचा दंड वसून केला. विशेष म्हणजे आयुक्तांच्या फोननंतर तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी एक नव्हे तर तब्बल तीन वेळा मंदीर परिसरात पथकांसह चकरा मारून नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. पथकात प्रभारी मुख्याधिकारी, नायब तहसीलदार एस.बी. देशमुख, मंडळ अधिकारी विलास सोनवणे, तलाठी डी.पी. गोरे, स्वच्छता निरीक्षक अंकुश भराड, शेजारी बेग, सुरेश वाघ, कलिमोद्दीन शेख, पोलीस कर्मचारी यांचा सहभाग होता.
----
फोटो : मास्क न लावलेल्या भाविकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करताना पथक.
260621\26_2_abd_23_26062021_1.jpg
भद्रा मारूती मंदिर परिसरात कारवाई करताना तहसीलचे पथक