घाटीत ११ महिन्यांत कोरोना मृत्यू @ १००३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:44+5:302021-03-04T04:06:44+5:30
तीन हजार रुग्णांना आणले मृत्यूच्या तावडीतून बाहेर औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येने बुधवारी एक हजाराचा आकडा ...
तीन हजार रुग्णांना आणले मृत्यूच्या तावडीतून बाहेर
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येने बुधवारी एक हजाराचा आकडा ओलांडला. घाटीत गेल्या वर्षभरापासून डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. गंभीर रुग्णांसाठी घाटीचा मोठा आधार मिळत असून, आतापर्यंत तब्बल तीन हजार रुग्णांना मृत्यूच्या तावडीतून बाहेर आणले. परंतु दुर्दैवाने याठिकाणी उपचार सुरू असताना ११ महिन्यांत एक हजार ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
घाटी रुग्णालयात ५ एप्रिल २०२० रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील आणि संपूर्ण मराठवाड्यातील कोरोनाचा तो पहिला बळी ठरला होता. जिल्ह्यात १३ मेपासून तब्बल ६ महिने दररोज कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत होता. ही स्थिती नोव्हेंबरमध्ये थांबली. घाटीत औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून कोरोनाचे गंभीर रुग्ण दाखल होतात. शिवाय कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रकृती गंभीर झाली की, अनेक खासगी रुग्णालयांतून रुग्णांना सरळ घाटीत रेफर केले जात आहे. घाटीत मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांत अनेक रुग्ण हे खासगी रुग्णालयांनी 'रेफर' केलेले आहेत. रुग्ण गंभीर असो की सौम्य, प्रत्येक रुग्णाला दाखल करून घेण्यास घाटीत प्राधान्यक्रम दिला जातो. परंतु अनेक रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्याला दाखल होतात. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळत नाही आणि रुग्णाचा मृत्यू ओढवतो, असे घाटीतील डाॅक्टरांनी सांगितले.
---
घाटीत सध्या दाखल कोरोना रुग्ण-२१४
सामान्य प्रकृती-१२७
गंभीर प्रकृती-८७