कोरोनामुळे पीएच.डी.धारकांच्या उत्साहावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:05 AM2021-05-25T04:05:46+5:302021-05-25T04:05:46+5:30

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यापीठाने ६१ वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, यावेळी ...

Corona drains the enthusiasm of PhD holders | कोरोनामुळे पीएच.डी.धारकांच्या उत्साहावर विरजण

कोरोनामुळे पीएच.डी.धारकांच्या उत्साहावर विरजण

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यापीठाने ६१ वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, यावेळी पाहुण्यांच्याहस्ते सन्मानपूर्वक पदवी घेण्याची संधी हुकणार असल्यामुळे पीएच.डी.धारकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वर्षभरापासून पीएच.डी.चा व्हायवा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सुमारे ५१० विद्यार्थ्यांचा ऑनलाईन व्हायवा झालेला असून त्यांना पीएच.डी. ॲवाॅर्ड करण्यात आली आहे. यंदा या विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभे राहूनच काउंटरवरून पदवी घ्यावी लागणार आहे. दीक्षांत समारंभात केवळ पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांनाच प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते पदवी देऊन व्यासपीठावर सन्मान करण्याची प्रथा आहे. हा सन्मान मिरवण्यासाठी समारंभाच्या दोन-तीन दिवस अगोदरपर्यंत पीएच.डी. प्राप्त करण्यासाठी अनेकांचा आटापिटा चाललेला असतो. मात्र, यंदा ही प्रथा कोरोनामुळे गुंडाळून ठेवावी लागली.

तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळापासून पदवीदान समारंभाच्या दिवशी एम.फिल्‌. व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात काउंटरवर पदव्या दिल्या जातात, तर पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये पदव्यांचे वाटप केले जाते.

जूनअखेरीस ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या समारंभासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १० जूनपर्यंत पदवी, पदव्युत्तर, एम.फिल्‌. व पीएच.डी.धारकांकडून आवेदने मागविण्यात आली आहेत. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी कुलगुरू पदाची सूत्रे घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सप्टेंबर २०१९ मध्ये ५९ वा व फेब्रुवारी २०२० मध्ये ६० वा दीक्षांत समारंभ घेण्यात आला होता. यंदा ६१ व्या दीक्षांत समारंभासाठी अद्याप प्रमुख पाहुणे निश्चित झालेले नाहीत.

चौकट........

पदवीसाठी १० जूनपर्यंत अर्जाची मुदत

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेण्यात येणाऱ्या ६१ व्या दीक्षांत समारंभात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ आणि मार्च-एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण केले जाणार आहे. पदव्युत्तर, एम.फिल्‌. व पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांनी तसेच पदवी अभ्यासक्रमाच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासोबत पदवी मिळण्यासाठी अर्ज केलेला नसेल, अशांना १० जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज भरून व्यक्तिश: अथवा टपालाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागास साक्षांकित हार्ड कॉपी सादर करावी लागणार आहे.

Web Title: Corona drains the enthusiasm of PhD holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.