कोरोना इफेक्ट : मसाल्याची मागणी अन् कोरोनाच्या भीतीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:06 PM2020-09-02T16:06:15+5:302020-09-02T16:13:51+5:30
आता जसजशी अनलॉक प्रक्रिया सुरू झाली, तसतशी लोकांच्या मनातून कोरोनाची भीतीही कमी होत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आता काढ्याचे नियमित सेवनही थांबविले आहे.
औरंगाबाद : मार्च महिन्याच्या मध्यावर कोरोना भारतात अवतरला आणि त्यानंतर कोरोनाच्या भीतीमुळे कडाक्याचा उन्हाळा असूनही उष्ण पदार्थांची मागणी तीव्रतेने वाढत गेली. आता मात्र कोरोनाच्या भीतीमध्ये जसजशी घट होत आहे, तसतशी घट आता उष्ण पदार्थांच्या मागणीतही होताना दिसते आहे.
कोरोनाचे सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे सर्दी आणि खोकला. सर्दी, खोकला होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण सतर्क होता. परिणामी उष्ण पदार्थ सेवन करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत गेली. अशातच आयुष मंत्रालयातर्फे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काढा कसा करायचा, हे सांगण्यात आले. त्यानुसार बहुतांश लोकांनी हळद, सुंठ, काळे मिरे, ओवा, दालचिनी, लवंग या पदार्थांपासून काढा तयार केला आणि त्याचे नियमित सेवन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऐन उन्हाळा असतानाही या पदार्थांच्या मागणीत चारपट वाढ झाली होती, असे मोंढ्यातील व्यापारी श्रीकांत खटोड यांनी सांगितले.
मशीद उघडण्यास जात असताना खासदार जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले. #aurangabadhttps://t.co/PY5Dn8vbxp
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 2, 2020
एरवी उन्हाळा असताना उष्ण पदार्थांची मागणी घटत जाते आणि थंड पदार्थांची मागणी वाढत जाते, परंतु यावर्षीच्या उन्हाळ्यात मात्र कोरोनाच्या भीतीमुळे पूर्णपणे विरुद्ध चित्र दिसून आले. अनेक घरांमध्ये तर सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याआधीच या पदार्थांपासून केलेला काढा सेवन केला जायचा. काही घरांमधील महिलांनी तर एकेक किलो काढा तयार करून ठेवला होता. यासोबतच लसूण, अद्रक यांची मागणीही वाढली. व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत असणारे लिंबू आणि पपई यांनाही चांगलीच मागणी होती. तसेच आवळ्याच्या पदार्थांच्या मागणीमध्ये वाढ होते. काढ्यासोबत अनेक जण मध आणि गूळ हे उष्ण पदार्थही सेवन करायचे. त्यामुळे दालचिनी, हळद, सुंठ, लवंग, मिरे याखालोखालच मध, गूळ, गवती चहा यांनाही मागणी होती, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
पती सह गावातील तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु #doublemurderhttps://t.co/uNagohqSZ1
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 2, 2020