डायलिसिससाठी कोरोना तपासणीची अट तापदायक; उशीर जीवावर बेतण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 07:14 PM2020-06-15T19:14:36+5:302020-06-15T19:20:25+5:30
या रुग्णांना तात्काळ तपासण्या करून मिळण्याची व्यवस्था गरजेची बनली आहे.
औरंगाबाद : घाटीतील डायलिसिस सुविधा कोविड रुग्णांसाठी राखीव झाल्याने कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयांत फेऱ्या माराव्या लागत आहेत, तर डायलिसिस करण्यापूर्वी कोरोना तपासणी गरजेची केलेली असल्याने रुग्णांच्या अडचणीत आणखी भर पडली. अतिजोखमीच्या रुग्णांच्या डायलिसिसमध्ये उशीर झाल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याने या रुग्णांना तात्काळ तपासण्या करून मिळण्याची व्यवस्था गरजेची बनली आहे.
१७ टक्के लोकांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मूत्रपिंडाचे विकार आढळतात. भारतीय मूत्रपिंंडविकार माहिती संकलन केंद्राच्या आकडेवारीनुसार औरंगाबादेत १७०० लोकांना डायलिसिसची गरज आहे. त्यापैकी निम्मे रुग्ण डायलिसिस करतात. त्या तुलनेत शहरात केवळ १५ पेक्षा कमी तज्ज्ञ, तर तेवढेच डायलिसिस सेंटर आहेत. डायलिसिसचे हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियल म्हणजे पोटातील डायलिसिस, असे दोन प्रकार आहेत. हिमोडायलिसिसमध्ये मशीनद्वारे रुग्णालयात रक्ताच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया होते, तर पोटातील डायलिसिसमध्ये पोटात विशिष्ट प्रकारची नळी टाकली जाते. त्यातून द्रव टाकून रक्त शुद्धीकरण केले जाते. ही प्रक्रिया रुग्ण घरीच करू शकतो. त्यामुळे शहरात पोहोचू न शकणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, या खर्चिक उपचाराला शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने अडचण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सहा युनिटची सुविधा लवकरच
घाटीत सुपरस्पेशालिटी ब्लॉकमध्ये सहा यंत्रांचे इन्स्टॉलेशन झाले आहे. तेथील पाणी शुद्धी प्रकल्पाच्या पाण्याच्या दोन तपासण्या झाल्या. त्यात दोष आढळून आल्याने आता नव्याने पुन्हा निर्जंतुकीकरण करून तपासण्या करण्यात येतील, अशी माहिती उपअधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली. सुपरस्पेशालिटी ब्लॉकमधील डायलिसिस युनिट लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते सुरू होईलपर्यंत पर्यायी व्यवस्था धूत रुग्णालयात केलेली आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
तपासणीस उशीर झाल्यास जिवावर बेतण्याची शक्यता
डायलिसिसपूर्वी कोरोनाची तपासणी अनिवार्य केल्याने मनपा तपासणी केंद्रावरून तपासणी केल्यावर अहवालाची प्रत डायलिसिस केंद्रावर दिली, तेव्हा डायलिसिस झाले. सुरक्षिततेसाठी ते गरजेचे असले तरी खेड्यातून येणाऱ्या व गंभीर रुग्णांना तपासणीत अडचणी आल्यास होणारा उशीर जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तपासणी अनिवार्य केली तशी विनाआडकाठीची स्वतंत्र व्यवस्था तपासणीसाठी असली पाहिजे, असे डायलिसिसवर असलेल्या एका महिला रुग्णाने सांगितले.
रुग्णाने अगोदरच तपासण्या कराव्यात; त्याला पर्याय नाही
पुढचे डायलिसिस कधी आहे हे रुग्णांना माहीत असते. त्यापूर्वी दोन दिवस अगोदरच रुग्णांच्या आवश्यक तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. आधीच जोखमीचे रुग्ण असताना त्यांना ताप आल्यास क्ष किरण, रक्त तपासण्या केल्या जातात. त्यात शंका आल्यास मात्र कोरोनाच्या तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले जाते. तो अहवाल यायला किमान २४ तास लागतात. त्यामुळे आधीच तपासणी करून घेणे गरजेचे आहे. अहवाल येईपर्यंत डायलिसिसची गरज पडल्यास अडचणीचे होते. यात उशीर झाल्यास रुग्ण दगावण्याच्याही घटना घडल्या आहेत, त्यामुळे रुग्णांनी अगोदरच तयारी करावी.
-डॉ. सुहास बाविकर, नेफ्रोलॉजिस्ट