एकाच घरातील पणजीपासून पणतूपर्यंत अनुभवला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:02 AM2021-07-08T04:02:02+5:302021-07-08T04:02:02+5:30
फुलंब्री : तालुक्यातील बाबरा येथील एकाच कुटुंबातील पणजीपासून ते पणतूपर्यंत अशा सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे ...
फुलंब्री : तालुक्यातील बाबरा येथील एकाच कुटुंबातील पणजीपासून ते पणतूपर्यंत अशा सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे हे सर्व कुटुंब या अरिष्टातून सुखरूप बाहेर आले आहे. यात नव्वद वर्षांच्या वृद्धेचाही समावेश आहे.
गल्ली ते दिल्ली कोरोनाचा कहर सुरू आहे. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील जाईबाई रावजी तारू (९०) या वृद्धेसह त्यांचा मुलगा नारायण रावजी तारु (६६), सून राहीबाई नारायण तारू (६०), नातू ज्ञानेश्वर नारायण तारू (२८), नातसून वर्षा ज्ञानेश्वर तारू (२५) व पणतू रघुवीर ज्ञानेश्वर तारू (२) या सर्वांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोची बांधा झाली होती. एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बाबरा गावही हादरले होते. या सर्वांना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दहा दिवस त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे, डॉ. डकले, डॉ. त्रिभुवन, डॉ. मोरे, डॉ. काळे, डॉ. पल्हाळ, परिचारिका मोहिनी काटकर, अश्विनी चिखले, पूजा वाघ, गीता कुलकर्णी यांनी या रुग्णांवर उपचार केले. यामुळे या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यामुळे गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
चौकट
९० वर्षांच्या जाईबाई व २ वर्षांच्या रघुवीरची होती चिंता तारु कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर कुटुंबातील वयस्कर ९० वर्षांच्या जाईबाई व दोन व दोन वर्षांचा रघुवीर या दोघांची गावकऱ्यांसह आरोग्य पथकालाही चिंता होती. मात्र या दोघांनीही इतर कुटुंबीयांसह दहा दिवसांत कोरोनावर यशस्वी मात केली. यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
फोटो कॅप्शन : बाबरा येथील तारू कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयातून निरोप देताना डॉ. अभिजित खंदारे, डॉ. डकले व इतर स्टाफ.