कोरोनाने ‘खाल्ली’ हजारोंची ‘ओआरएस’ पावडर; मुदतबाह्य साठ्याची लपवालपवी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:43 PM2022-07-26T17:43:31+5:302022-07-26T18:42:45+5:30

शासनाचे पैसे ‘पाण्यात’, कोरोना काळात ‘ओआरएस’ची पाकिटे कालबाह्य

Corona has 'eaten' thousands of 'ORS' powder; Concealment of expired ORS stock | कोरोनाने ‘खाल्ली’ हजारोंची ‘ओआरएस’ पावडर; मुदतबाह्य साठ्याची लपवालपवी

कोरोनाने ‘खाल्ली’ हजारोंची ‘ओआरएस’ पावडर; मुदतबाह्य साठ्याची लपवालपवी

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
कोरोनाने हजारो रुपयांची ‘पावडर’ खाल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही पावडर म्हणजे ‘ओआरएस’ची पावडर. पण, घाबरू नका, कोरोना विषाणूने ही पावडर काही खरोखरीच खाल्लेली नाही, तर त्या काळात सर्व यंत्रणा कोविड नियंत्रणात गुंतली होती. तेव्हा हजारो रुपयांची ‘ओआरएस’ची पाकिटे कालबाह्य झाली आहेत. एका कक्षात ‘ओआरएस’ची अनेक खोकी पडून असून, शासनाचे हजारो रुपये ‘पाण्यात’ गेले आहेत.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे बालकांना अतिसाराची लागण होण्याचा धोका वाढतो. अनेकदा अतिसार बालकांच्या जीवावरही उठण्याची भीती असते. त्यामुळे राज्यात १ जुलैपासून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात आला. यामध्ये ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना ‘ओआरएस’चे वाटप करण्यात आले. ही झाली आताची परिस्थिती. परंतु कोरोना प्रादुर्भावात म्हणजे २०२० ते २०२१ या कालावधीत ‘ओआरएस’च्या शेकडो पाकिटांचे वाटपच झाले नसल्याची बाब समोर आली आहे. आमखास मैदानासमोरील जिल्हा नेत्र विभागाच्या एका कक्षात मुदतबाह्य झालेल्या पाकिटांचा साठा ठेवण्यात आला आहे. जवळपास ५० खोकी या ठिकाणी पडून आहेत.

काय आहे तारीख?
‘ओआरएस’च्या मुदतबाह्य पाकिटांवर निर्मिती तारीख फेब्रुवारी २०१९ नमूद करण्यात आलेली आहे. तर मुदतबाह्य होण्याची तारीख जानेवारी २०२१ लिहिलेली आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून हा साठा पडून असल्याची परिस्थिती आहे.

बालके राहिली वंचित
बालकांमधील अतिसार नियंत्रणासाठी ‘ओआरएस’ देणे महत्त्वपूर्ण ठरते. परंतु ‘ओआरएस’ची पाकिटे मुदतबाह्य झाल्याने कोरोना काळात अनेक बालके त्यापासून वंचित राहिल्याची भीती व्यक्त होत आहे.

आरोग्य अधिकारी म्हणाले...
प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अभय धानोरकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व ‘ओआरएस’चे वाटप केले आहे. सध्या आमच्याकडे साठा नाही. कालबाह्य झालेल्या ‘ओआरएस’विषयी काही सांगता येणार नाही. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ यांनी सांगितले की, मुदतबाह्य ‘ओआरएस’चे वाटप केले जात नाही. कालबाह्य ‘ओआरएस’संदर्भात माहिती घेतली जाईल.

Web Title: Corona has 'eaten' thousands of 'ORS' powder; Concealment of expired ORS stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.