मागील ११ महिन्यांमध्ये घाटी रुग्णालयात कोरोनाने १,०७३ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 05:58 PM2021-03-17T17:58:11+5:302021-03-17T18:01:06+5:30
Death due to Corona कोरोनाचा गंभीर रुग्ण म्हटला की, ग्रामीण भागातील रुग्णालये असोत की, खासगी रुग्णालये, सरळ घाटीत रेफर केले जाते.
औरंगाबाद : कोरोनाच्या ३ हजारांवर गंभीर रुग्णांना घाटी रुग्णालयाने मृत्यूच्या तावडीतून बाहेर आणले. मात्र, दुर्दैवाने गेल्या ११ महिन्यांत येथे औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांतील तब्बल १,०७३ रुग्णांचा मृत्यू झाला.
कोरोनाचा गंभीर रुग्ण म्हटला की, ग्रामीण भागातील रुग्णालये असोत की, खासगी रुग्णालये, सरळ घाटीत रेफर केले जाते. कोरोना महामारीत गंभीर रुग्णांवर उपचार करणारे एकमेव शासकीय रुग्णालय म्हणून घाटीचा गोरगरीब रुग्णांना आधार मिळत आहे. घाटीत ५ एप्रिल रोजी पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू मराठवाड्यातील पहिला कोरोना बळी ठरला होता. जिल्ह्यात १२ मे २०२० पर्यंत कोरोनामुळे १७ जणांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर म्हणजे १३ मेपासून तब्बल सहा महिने नोव्हेंबरपर्यंत रोज मृत्यू होत गेले. या कालावधीत घाटीत सर्वधिक मृत्यू हे सप्टेंबर महिन्यात झाले. या महिन्यात १९७ रुग्णांचा मृत्यू झाला. तेव्हा कोरोना रुग्णांची आणि त्यातही गंभीर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. रुग्णांना खाटाही मिळणे अवघड झाले होते. आता गेल्या महिन्याभरापासून पुन्हा अशीच अवस्था झाली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या १६ दिवसांतच घाटीत तब्बल ७९ रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. यात औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांतील रुग्णांचाही समावेश आहे.
ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांतून केवळ ऑक्सिजनची गरज असलेले रुग्णही घाटीत येतात. केवळ १५ ते २० टक्के रुग्ण ९० टक्क्यांवर ऑक्सिजन पातळी असलेले दिसून आले. उर्वरित रुग्ण हे स्टेज-४, स्टेज-५ मधील आहे. रुग्ण लवकर रुग्णालयात आल्यास गंभीर रुग्णास ऑक्सिजन लवकर देता येते. गंभीर रुग्णासाठी ऑक्सिजन अधिक फायदेशीर ठरतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
घाटीतील मृत्यूची स्थिती
कालावधी मृत्यू
५ एप्रिल ते ३० जून - २०४
१ ते ३१ जुलै - १५५
१ ते ३१ ऑगस्ट- १६७
१ ते ३० सप्टेंबर- १९७
१ ते ३१ ऑक्टोबर- १०७
१ ते २९ नाेव्हेंबर - ५५
३० नाेव्हेंबर ते ३१ डिसेंबर- ४९
१ ते ३१ जानेवारी - २९
१ ते २८ फेब्रुवारी- ३१
१ ते १६ मार्च- ७९