कोरोनाचा मृत्यूदर औरंगाबाद तालुक्यात सर्वात कमी, खुलताबादमध्ये सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 06:45 PM2020-11-19T18:45:55+5:302020-11-19T18:47:49+5:30
जिल्ह्याचा एकूण मृत्यूदर २.६ आणि ग्रामीण भागाचा मृत्यूदर २.१ टक्के आहे
औरंगाबाद : कोरानासंदर्भात जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात दिलासादायक स्थिती आहे. या तालुक्यात कोरोनाचा सगळ्यात कमी म्हणजे १.० टक्का मृत्यूदर आहे, तर सर्वाधिक मृत्यूदर खुलताबाद तालुक्याचा ४.७ आहे. जिल्ह्यापेक्षा २ टक्क्यांनी खुलताबादचा मृत्यूदर अधिक आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात एप्रिलपासून शनिवारपर्यंत (दि.१४) १,११४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात ग्रामीण भागांमधील ३१८ लोकांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ७० लोकांचा बळी गेला आहे. तर सोयगाव तालुक्यात सर्वात कमी ६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्याचा एकूण मृत्यूदर २.६ आणि ग्रामीण भागाचा मृत्यूदर २.१ टक्के आहे; परंतु यापेक्षाही अधिक मृत्यूदर हा खुलताबादपाठोपाठ सिल्लोड, फुलंब्री, कन्नड तालुक्यांचा आहे. जिह्यातील ग्रामीण भागाचा मृत्यूदर २.१ असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली. ग्रामीण भागातील मृत्यू दर रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यातील कोरोना मृत्यूची स्थिती
तालुका मृत्यू मृत्यूदर
औरंगाबाद ४५ १.०
फुलंब्री १९ ३.६
गंगापूर ७० २.१
कन्नड ४५ ३.२
खुलताबाद १४ ४.७
सिल्लोड ४३ ३.८
वैजापूर २९ १.५
सोयगाव ६ २.१
पैठण ४७ २.७
एकूण ३१८ २.१