पर्यटननगरी औरंगाबादला ‘कोरोना’चा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:32 AM2020-03-04T04:32:36+5:302020-03-04T04:32:46+5:30
कोरोना विषाणूचा पर्यटकांनीदेखील धसका घेतला आहे. परिणामी, पर्यटनाचे नियोजन रद्द करण्यावर भर देण्यात येत आहे.
औरंगाबाद : कोरोना विषाणूचा पर्यटकांनीदेखील धसका घेतला आहे. परिणामी, पर्यटनाचे नियोजन रद्द करण्यावर भर देण्यात येत आहे. पर्यटननगरी औरंगाबादला याचा मोठा फटका बसत असून, मार्च महिन्यांतील ७० टक्के बुकिंग रद्द झाली. त्यामुळे हॉटेल्स, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
जगभरातील पर्यटक भारतातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येतात. भारतात येणारे बहुतांश परदेशी पाहुणे हे जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना आवर्जून भेट देतात. शहरातील बीबी का मकबरा, पाणचक्की याठिकाणी भेट देण्यास प्राधान्य दिले जाते. या पर्यटनस्थळावर परदेशी पर्यटकांबरोबर भारतातील विविध भागांतून येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या अधिक आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथून विमानाने दाखल होऊन पर्यटक वाहनांनी अजिंठा, वेरूळ लेणीला जातात. औरंगाबादेत येण्यापूर्वी पर्यटक हॉटेल, वाहनांची बुकिंग करतात. अनेक महिन्यांपूर्वीच पर्यटनाचे नियोजन झालेले असते; परंतु कोरोनामुळे हे नियोजन रद्द करण्याचे प्रमाण वाढल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
औरंगाबादेत गेल्या काही कालावधीत नव्या विमानसेवा सुरू झालेल्या आहेत. पर्यटनाचा बेत रद्द करण्यात येत असल्याने विमान प्रवासी संख्येवरही परिणाम होणार आहे. देश-विदेशांतील पर्यटकांना भारतातील ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविणारी आलिशान डेक्कन ओडिसी औरंगाबादेत मार्चमध्ये वेगवेगळ्या दिवशी दाखल होणार आहे. या शाही रेल्वेने येणाºया पर्यटकांच्या संख्येतही घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
१५० रूमची बुकिंग रद्द
शहरातील एका हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले, की मार्च महिन्यातील १५० रूमची बुकिंग रद्द करण्यात आली आहे. इटलीसह इतर देशांतून येणाºया पर्यटकांनी बुकिंग रद्द केली आहे. जालना रोडवरील ज्या हॉटेलमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात थांबतात, तेथील काही बुकिंगही रद्द झाल्याचे सांगण्यात आले. इतर हॉटेल्समध्येही अशी परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले.
>व्यवसायावर परिणाम
आपल्याकडे मार्चपर्यंत पर्यटनाचा हंगाम असतो; परंतु गेल्या काही दिवसांत मार्चमधील जवळपास ७० टक्के बुकिंग रद्द झाली आहेत. विमान प्रवाशांच्या संख्येवरही परिणाम होत आहे. या सगळ््याचा हॉटेल व्यवसाय, ट्रॅव्हल्स व्यवसायावर परिणाम होत आहे. डेक्कन ओडिसीने येणाºया पर्यटकांच्या संख्येवरही परिणाम होण्याची भीती आहे.
- जसवंतसिंह राजपूत,
अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम
डेव्हलपमेंट फोरम
पर्यटकांची संख्या घटली
औरंगाबादेत पर्यटनासाठी येण्यापूर्वी वाहनांची बुकिंग केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत मार्चमधील ३० टक्के बुकिंग रद्द झाली आहे. कोरोनामुळे परदेशी पर्यटक येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, व्यवसायाला फटका बसत आहे.
- अब्दुल अजीज, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक