पहिली लाट रोखलेल्या ४६ गावांत कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:04 AM2021-04-28T04:04:12+5:302021-04-28T04:04:12+5:30
रऊफ शेख फुलंब्री : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वर्षभरापासून कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखण्यासाठी ...
रऊफ शेख
फुलंब्री : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वर्षभरापासून कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या गावांना मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाने घेरले. तालुक्यात सुमारे ४६ गावांत कोरोनाचा शिरकाव केल्याचे आढळून आले आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणेच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
फुलंब्री तालुक्यात पहिला कोरोना संक्रमित रुग्ण शहरात ११ जून २०२० रोजी आढळून आला होता. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. डिसेंबर २०२० पर्यंत ५१७ कोरोना रुग्ण आढळून आले, तर दुसऱ्या लाटेत जानेवारी ते १३ एप्रिल या साडेतीन महिन्यांतच ८८४ जणांना बाधा झाल्याचे समोर आले. तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट अतिशय झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील ८२ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला आहे, तर आज स्थितीला जानेफळ, हिवरा, पोकळा, लालवन, वाघलगाव, आडगाव, फाजलवाडी, गुमसताला, पाडळी, जातवा या दहा गावांमध्ये कोरोनाबाधित एक-दोन रुग्ण आढळून आले. मात्र, योग्य उपाययोजना केल्या गेल्याने ही गावे आता कोरोनामुक्त झालेली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोनाने शिरकाव केलेली गावे :
सुलतानवाडी, शेलगाव, चिंचोली, सांजूळ, पिंपळगाव वळण, म्हसला, वडोद खुर्द, धानोरा, रेलगाव, मारसावळी, उमरावती, मालोदेवाडी, जळगाव मेटे, ममनाबाद, गेवराई पायगा, विरमगाव, पेंडगाव, जातवा, वाकोद, अडगाव, वाहेगाव, वाघोळा, टाकळी कोलते, तळेगाव, शहापूर, जानेफळ, गेवराई गुंगी.
प्रतिक्रिया :
गावांमध्ये कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यापासून या रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. पण नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार झालेला आहे.
- व्हालाबाई पवार, सरपंच, बाबरा
ग्रामपंचायतीकडून कोरोनासंदर्भात दिलेल्या नियमाचे पालन केले जात असले तरी काही नागरिक कार्यक्रमांना बाहेरगावी गेल्याने दुसऱ्या लाटेत यांचा प्रादुर्भाव वाढला, गावात मात्र काळजी घेतली जात आहे. - वैशाली जाधव, सरपंच, वारेगाव
कोरोनाकाळ सुरू झाल्यापासून गावात ग्रामपंचायतीकडून आवश्यक ती जनजागृती व उपयोजना करण्यात आल्या. पण नागरिकांनी थंडीताप आल्यानंतर तपासणीसाठी येणे टाळले. परिणामी दुसऱ्या लाटेत कोरोना संक्रमित रुग्णसंख्या वाढली होती. आजच्या घडीला रुग्णसंख्या नगण्य आहे.
- भारती शेळके, सरपंच, आळंद
----
तालुक्यात एकूण कोरोना संसर्ग असलेली गावे - ८२
एकूण कोरोनामुक्त गावे - १०
एकूण कोरोना संक्रमित रुग्णसंख्या - १४१७
बाधित मृतांची संख्या : ५०