शहरातील ६ एन्ट्री पॉइंटवर शनिवारपासून कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:02 AM2021-03-19T04:02:17+5:302021-03-19T04:02:17+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा कहर वाढत चालल्यामुळे महापालिकेने आता सहा एन्ट्री पॉइंटवर चोवीस तास पथके तैनात करून तपासणीचा निर्णय घेतला ...
औरंगाबाद : कोरोनाचा कहर वाढत चालल्यामुळे महापालिकेने आता सहा एन्ट्री पॉइंटवर चोवीस तास पथके तैनात करून तपासणीचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून शहरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाईल. ज्या प्रवाशांना लक्षणे दिसतील त्यांची अॅन्टीजेन चाचणी केली जाईल, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी गुरुवारी दिली. केंद्रीय पथकाने गेल्या आठवड्यात सूचना केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन आठवड्यांपासून शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागावर प्रचंड ताण येत आहे. पालिकेने १२ कोविड केअर सेंटर सुरू केले असून, आणखी सेंटर सुरू करावे लागण्याची शक्यता आहे. संसर्ग कमी करण्यासाठी आता जास्तीच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात येणारी वाहने थांबवून प्रवाशांची स्क्रिनिंग केली जाईल. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसून येतील, त्यांच्या चाचण्या करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाईल. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्यांनाच शहरात प्रवेश दिला जाईल, असे डॉ. पाडळकर यांनी नमूद केले.
या ठिकाणी होईल तपासणी
चिकलठाणा येथील केंब्रिज शाळा चौक, सावंगी येथील टोल नाका, दौलताबाद टी पॉइंट, नक्षत्रवाडी, झाल्टा फाटा या ठिकाणी कोरोना चाचणीसाठी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. गतवर्षी बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या प्रवाशांची या एन्ट्री पॉइंटवर तपासणी करण्यात आली होती. त्यात हजारो नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले होते.
१९ वॉर्ड रेड झोनमध्ये
कोरोना संसर्ग जास्तीचे रुग्ण असलेले १९ वॉर्ड रेड झोनमध्ये टाकले आहेत. या ठिकाणी जास्त चाचण्या करण्यासाठी पथके तयार केली आहेत. ही पथके लसीकरणासाठी मदत करतील, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.