कोरोना तपासणीसाठी दररोज दीड लाखाचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:05 AM2021-03-28T04:05:52+5:302021-03-28T04:05:52+5:30
औरंगाबाद : शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग दहा पटीने वाढला आहे. आठ ते दहा दिवस आजार अंगावर काढून ...
औरंगाबाद : शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग दहा पटीने वाढला आहे. आठ ते दहा दिवस आजार अंगावर काढून जास्त त्रास होऊ लागल्यावर नागरिक तपासणी करीत आहेत. उशिराने रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवणे घाटी रुग्णालयासाठी अत्यंत जिकिरीचे ठरत आहे. महापालिका लवकरच दररोज दहा हजार तपासण्या करणार आहे. सध्या ४ हजार तपासण्यांचा खर्च दीड लाखापर्यंत जात आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यातच कोरोना संसाराला सुरुवात झाली होती. महापालिकेने तातडीने दिल्ली येथून कोरोना तपासणीचे किट खरेदी केले होते. एका किटची किंमत जवळपास पाचशे रुपये होती. पैशांची चिंता न करता महापालिकेने मोठ्या प्रमाणात किटची खरेदी केली. अत्यंत यशस्वीपणे त्याचा वापरही केला. नंतर महाराष्ट्र शासनाने किट खरेदी करून महापालिकेला दिली. सध्या अधूनमधून किटचा तुटवडा जाणवतो. महापालिका प्रशासन शासनाने ठरवून दिलेल्या संस्थेमार्फत आणि अत्यंत कमी दरात किट खरेदी करीत आहे. अँटिजन किट ५७ रुपयांमध्ये एक मिळते आहे. आरटीपीसीआर किट फक्त १४ रुपयांना मिळते आहे. शुक्रवारी महापालिकेने जवळपास दोन हजार अँटिजन किटद्वारे नागरिकांची तपासणी केली. त्यामुळे जवळपास १ लाख रुपये खर्च आला. २ हजार ३९३ जणांची आरटीपीसीआर पद्धतीने तपासणी केली. यासाठी महापालिकेला ३३ हजार रुपये खर्च आला. महापालिका तीन ते चार दिवसांमध्ये शहरातील तपासण्यांची संख्या वाढविणार आहे. दररोज १० हजार तपासण्यांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. ८ हजार दररोज तपासण्या केल्या तरी जवळपास हा खर्च तीन लाखांपर्यंत जाणार आहे.