कोरोना तपासणीत चार तालुक्यातील ९ शिक्षक बाधित आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:41 PM2020-11-21T13:41:31+5:302020-11-21T13:43:44+5:30
दोन दिवसांत केवळ १४ टक्केच तपासणी
औरंगाबाद : नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांत १६४६ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी अहवाल प्राप्त झालेल्यांमध्ये ८ शिक्षक आणि १ कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळून आले. दोन दिवसांत १४ टक्केच शिक्षकांच्या तपासण्या झाल्याने पुढील दोन दिवसांत उर्वरित ८६ टक्के म्हणजे ९ हजार ८०० तपासण्या कशा पूर्ण होतील, असा प्रश्न शिक्षण विभागासह आरोग्य विभागाला सतावत आहे.
जिल्ह्यात ८८१८ शिक्षक, २६६५ शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण ११,४८३ जणांची कोरोना चाचणी करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाच्या मदतीने करण्यात आले. त्यानुसार १४६० शिक्षकांची, १७८ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अशी १६४६ जणांची ६४ तपासणी केंद्रांवर आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८ शिक्षक व एक शिक्षकेतर कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळून आल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी दिली. तपासणी केल्याशिवाय शिक्षकांना वर्गात प्रवेश नाही. त्या तपासणीत शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून येत असल्याने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतही भीतीचे वातावरण आहे, तर आरोग्य विभागाकडून एकदम तपासणीचा आकडा वाढल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही भर पडत असल्याने आरोग्य विभाग अधिक दक्ष झाला असून, उर्वरित शिक्षकांच्या तपासण्यांचे दिव्य शनिवार आणि रविवारमध्ये पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सर्वच शिक्षक सोमवारी तपासणी करून हजर राहू शकण्याची शक्यता मावळली आहे.
चार तालुक्यांत आढळले शिक्षक बाधित
फुलंब्री २, औरंगाबाद ग्रामीण २, कन्नड तालुक्यात ४, पैठण तालुक्यात १, अशा नऊ जणांचा बाधित आढळून आलेल्यांत समावेश असून, बाधित आढळून येत असलेल्यांना कोरोनाची लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले, तर त्यांच्यावर तेथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. शहरात सर्वाधिक चाचण्या झाल्या असून, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूर, फुलंब्रीत तपासणीचे प्रमाण अधिक आहे.
औरंगाबादेत १३९३ शिक्षकांची कोरोना तपासणी
राज्य शासनाच्या निर्देशानुसार इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार महानगरपालिकेतर्फे शहरात शुक्रवारी १३९३ शिक्षकांची तपासणी करण्यात आली. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शहरात १६ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. n गुरुवारी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये एकूण आठ शिक्षक पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले. यात ३ मनपा हद्दीतील व ५ बाहेरील शिक्षक आहेत. चिकलठाणा आरोग्य केंद्र, रामनगर, रिलायन्स मॉल, शिवाजीनगर, तापडिया कासलीवाल मैदान, एन ८, एन ११, एन २, छावणी, सिपेट कोविड सेंटर, किलेअर्क, एमजीएम आदी ठिकाणी चाचणी होत आहे.