कोरोनाने ३६ टन रंग वर्षभरासाठी लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:04 AM2021-03-27T04:04:57+5:302021-03-27T04:04:57+5:30
औरंगाबाद : कोरोनाने धूलिवंदनाचा रंग भंग करून टाकला आहे. धूलिवंदन अवघ्या दोन दिवसांवर असताना शुक्रवारी रंगाची दुकाने ओस पडल्याचे ...
औरंगाबाद : कोरोनाने धूलिवंदनाचा रंग भंग करून टाकला आहे. धूलिवंदन अवघ्या दोन दिवसांवर असताना शुक्रवारी रंगाची दुकाने ओस पडल्याचे चित्र दिसले. मागील वर्षीचा व यंदाचा मिळून ४० टनपैकी जवळपास ३६ टन रंग दुकानात लॉकडाऊन झाला आहे. आता तो रंग वर्षभर सांभाळून ठेवण्याचा प्रश्न विक्रेत्यांसमोर आहे.
कोरोना आणि त्यामुळे लावण्यात आलेला जमावबंदीचा आदेश व लॉकडाऊन यामुळे यंदाही होळी व धूलिवंदन सण साजरा करता येणार नाही.
शहरात मागील वर्षीचा १० टन रंग शिल्लक होता. त्यात यंदा होलसेल व्यापाऱ्यांनी ३० टन रंग उत्तर प्रदेशातील हाथरस व मध्यप्रदेशातील जबलपूर येथून आणला होता. याची ऑर्डर दोन ते तीन महिने अगोदरच द्यावी लागते. जानेवारीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी रंग पावडरची ऑर्डर दिली होती; पण रंग शहरात दाखल झाला त्यावेळेस कोरोना रुग्णाची संख्या वाढली होती. ४० रुपये किलोने पावडर रंग विकला जातो. शनिवार, रविवार व सोमवार तीन दिवस बाजारपेठ बंद राहणार आहे. यामुळे आज रंगांची विक्री होईल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. मागील आठवडाभरात होलसेलकडील ४ टन रंग विकला गेला, तोही किरकोळ विक्रेत्यांनी विक्रीला नेला. त्यातील किती विक्री झाला याची आकडेवारी अजून होलसेल विक्रेत्याकडे आली नाही.
चौकट
प्रतीक्षेत विक्रेते
शुक्रवारी बाजारपेठेमध्ये फेरफटका मारला असता जुना मोंढा, राजाबजार, गुलमंडी, सुपारी हनुमान रोड, औरंगपुरा, कुंभारवाडा या भागातील रंग विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले.