कोरोना असो किंवा नसो अंत्यसंस्काराला नागरिकांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 08:15 PM2021-03-10T20:15:32+5:302021-03-10T20:16:50+5:30
corona virus शहरात दररोज किमान पंधरा ते वीस नागरिकांचा वेगवेगळ्या कारणांमध्ये मृत्यू होत आहे. स्मशानभूमी आणि कब्रस्तानात अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रशासनाने लग्नकार्य करण्यास बंदी घातली आहे. मात्र, अंत्यसंस्काराला कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. एखाद्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला किंवा नाही याची खात्री न करता शेकडो नागरिक अंत्यसंस्काराला गर्दी करत आहेत. या प्रकाराकडे पोलीस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे हे विशेष.
शहरात दररोज किमान पंधरा ते वीस नागरिकांचा वेगवेगळ्या कारणांमध्ये मृत्यू होत आहे. स्मशानभूमी आणि कब्रस्तानात अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. याठिकाणी कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. अंत्यसंस्काराला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमके कशामुळे झाला हे सुद्धा माहीत नसते. मागील वर्षी कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर एखादा नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबातील दोन किंवा चार मंडळींनाच कब्रस्तान, स्मशानभूमीत हजर राहण्याची परवानगी होती. दुसऱ्या कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला असेल तर किमान ५० नागरिकांनाच उपस्थिती याची मुभा होती. सध्या शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, नागरिक स्वतःची काळजी घ्यायला तयार नाही. आजही कोरोना आजाराने मृत्यू झाल्यास पोलिसांची परवानगी लागते. यामध्ये अंत्यसंस्काराला कितीजण हजर राहावे याचा उल्लेख नाही. ज्यांना परवानगी दिली त्यांच्या अंत्यसंस्काराला किती गर्दी आहे याची खात्री ही आजपर्यंत पोलिसांनी केलेली नाही.
रुग्णालयातून मृतदेह स्मशानभूमीतच
एखाद्या नागरिकाचा कोरोना आजाराने मृत्यू झाल्यास मृतदेह महापालिकेने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेमार्फत थेट स्मशानभूमीत नेण्यात येतो. पुढील सर्व कारवाई महापालिकेकडून करण्यात येते. ज्यांच्याकडे पिवळे कार्ड आहे त्यांना अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा खर्चही महापालिका देते.
पोलिसांनी लक्ष देण्याची गरज
कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना पोलीस अंत्यसंस्काराची परवानगी देतात. महापालिका फक्त अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण करते. याठिकाणी नेमकी गर्दी किती होत आहे याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा