कोरोनाच्या उद्रेकाचा लघु-मध्यम उद्योगांना मोठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:22+5:302021-05-05T04:06:22+5:30
विजय सरवदे औरंगाबाद : कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे औरंगाबादेतील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. एप्रिलमध्ये ...
विजय सरवदे
औरंगाबाद : कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे औरंगाबादेतील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. एप्रिलमध्ये महाराष्ट्र तसेच आजूबाजूच्या राज्यांत लॉकडाऊन लागल्यामुळे ऑर्डरचे प्रमाण व पुरवठा साखळी विस्कळीत झाली. स्थानिक तसेच परप्रांतीय कामगार कमी झाल्यामुळे औरंगाबादेतील २० ते ३० टक्के उद्योगांवर उत्पादन प्रक्रिया थांबविण्याची वेळ आली.
औरंगाबादेत वाळूज, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, शेंद्रा आणि चितेगाव या प्रमुख पाच औद्योगिक वसाहतींमध्ये ५ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, तर जवळपास ५०० मोठे उद्योग आहेत. यामध्ये अडीच ते पावणे तीन लाख कामगार काम करतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधाचा (लॉकडाऊन) सर्वाधिक फटका सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बसला आहे. दिल्ली, मुंबई तसेच आजूबाजूच्या राज्यांतील मोठ्या शहरांमध्ये बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. ऑर्डरचे प्रमाणही कमी झाले आहे.
दुसरीकडे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या, निर्यात करणाऱ्या कंपन्या आणि कामगारांची निवास, भोजन व आरोग्याची सुविधा कंपन्यांमध्येच करणाऱ्या आस्थापनांना उत्पादन सुरू ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे अन्य अवलंबित सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांपैकी जवळपास २० ते ३० टक्के उद्योग बंद पडले असून उर्वरित उद्योगांची ३० टक्के उत्पादन क्षमता घटली आहे. त्यामुळे औरंगाबादेतील उद्योजक चिंतेत असून जीव आणि जीवनमान सुरक्षित असले तरच उद्योग टिकतील. त्यामुळे सुरू असलेल्या उद्योगांमध्ये कोरोना उपाययोजनांसंबंधीच्या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन केले जात आहे.
चौकट.........
स्थानिक मनुष्यबळाचाही तुटवडा
यासंदर्भात ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा मोठा परिणाम सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांवर झाला आहे. ३० टक्के उत्पादन क्षमता घटली असून तेवढ्याच प्रमाणात उद्योग बंद पडले आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी केवळ परप्रांतीय कामगारच गावी निघून गेले असे नाहीत, तर स्थानिक कामगारही भीतीपोटी गावी परतले आहेत. काहीजण लॉकडाऊन लागण्यापूर्वी निघून गेले ते अद्याप परतलेले नाहीत.