कोरोना प्रादुर्भावाने जिल्ह्यात रोजच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:02+5:302020-12-17T04:33:02+5:30
३०० चालक-वाहक मुंबईत : कर्तव्यासाठी कर्मचारी पडतात अपुरे, ग्रामीणच्या फेऱ्या होतात रद्द औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनापूर्वीच्या तुलनेत सध्या ‘एसटी’च्या ...
३०० चालक-वाहक मुंबईत : कर्तव्यासाठी कर्मचारी पडतात अपुरे, ग्रामीणच्या फेऱ्या होतात रद्द
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनापूर्वीच्या तुलनेत सध्या ‘एसटी’च्या दररोजच्या साधारण ९३३ फेऱ्यांत घट झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागांतील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागांतील प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यातही विभागातील ३०० चालक-वाहक बेस्टच्या कर्तव्यासाठी मुंबईला गेले आहेत. त्याचाही फटका बसत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर बससेवा सुरु झाली. परंतु कोरोनाच्या भीतीपोटी नागरिकांकडून प्रवास टाळण्यात येत होता. त्यामुळे प्रारंभी एसटी बसगाड्यांना प्रवासी संख्याच नव्हती. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेेने धावत नव्हती. याचा सर्वाधिक फटका चालक-वाहकांना बसला. बिनपगारी रजा घेण्याची सक्तीच चालक-वाहकांवर केली जात होती. परंतु ऑक्टोबरपासून कोरोनाचा विळखा कमी झाला. दिवाळीपासून प्रवाशांची संख्याही वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला कर्तव्य मिळण्यास सुरुवात झाली.
जिल्ह्यातील आगार-८
जिल्ह्यातील बसेसची एकूण संख्या-५५०
एकूण चालक-१२०१
एकूण वाहक-९३४
बसफेऱ्यांची संख्या
कोरोनाच्या आधी दररोजच्या फेऱ्या -१९८७
आता रोज होणाऱ्या फेऱ्या-१०५४
लॉकडाऊन हजेरी न देता रजा
सध्या चालक-वाहकांना काम मिळत नाही, असा प्रश्न नाही. मात्र, जेव्हा कोरोनानंतर बस सुरू झाली तेव्हा पूर्ण क्षमतेने वाहतूक होत नव्हती. त्यामुळे चालक-वाहकांना कर्तव्य मिळाले नाही. ऑक्टोबरमध्ये लॉकडाऊन हजेरी न देता खाती रजा दर्शविण्यात आली. परंतु त्याचा पगार देण्यात आलेला नाही. यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.
-बाबासाहेब साळुंके, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना
प्रत्येकाला कर्तव्य
चालक-वाहकांना रजा देण्याची वेळ येत नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याला कर्तव्य मिळत आहे. विभागातील ३०० चालक-वाहक बेस्ट उपक्रमासाठी मुंबईला गेलेले आहे. विभागाच्या उत्पन्नात गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ
चालक-वाहकांना सुटी देण्याचा प्रकार थांबला
लॉकडाऊनमध्ये एसटीची सेवा ठप्प होती. त्यानंतर जेव्हा सेवा सुरु झाली, तेव्हा काही मोजक्या बस धावत होत्या. परिणामी, चालक-वाहकांना कर्तव्य मिळत नव्हते. तेव्हा बिनपगारी रजा घेण्याची नामुष्की चालक-वाहकांवर ओढावली. त्यास संघटनांनी विरोध केला. आजघडीला चालक-वाहक मुंबईला गेल्याने कर्मचारी अपुरे पडत आहे. परिणामी, चालक-वाहकांनी सुटी मागितली तरी सुटी मिळत नसल्याची स्थिती आहे.
औरंगाबाद विभागाच्या उत्पन्नात वाढ
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे कोरोनापूर्वी रोजचे उत्पन्न ५० लाखांच्या घरात होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सुरुवातीला १० ते १५ लाखापर्यंत उत्पन्न मिळत होते. दिवाळीपासून मात्र, उत्पन्नात वाढ होत गेली आहे. आजघडीला ४० लाखापर्यंत उत्पन्न पोहोचले आहे.