Sandipan Bhumre: 'कोरोना रुग्ण रोजगार हमीच्या कामावर'; रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या गावातच गैरव्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 08:16 PM2021-05-22T20:16:53+5:302021-05-22T20:34:14+5:30
Maharashtra Rojgar Hami Yojana Scam: विशेष म्हणजे पाचोड ग्रामपंचायतीचे सरपंच रोहयोमंत्री भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे असताना पाचोड ग्रामपंचायतींतर्गत झालेल्या या रोहयो कामात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.
पैठण ( औरंगाबाद ) : रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री संदीपान भुमरे यांचे गाव असलेल्या पाचोड गावात धनदांडग्यांच्या नावावर रोहयोचे जॉबकार्ड तयार करून लाखो रुपये लाटल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. पैसे लाटताना चक्क कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे रुग्ण रोहयोच्या कामावर दाखविण्याचा प्रताप यंत्रणेने केला. विशेष म्हणजे पाचोड ग्रामपंचायतीचे सरपंच रोहयोमंत्री भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे असताना पाचोड ग्रामपंचायतींतर्गत झालेल्या या रोहयो कामात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता गोर्डे यांनी केली आहे. (Maharashtra Rojgar Hami Yojana Scam in minister sandipan bhumre village.)
पैठण तालुक्यात मजुरांसाठी रोहयोंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर आहेत. या कामांवर मजुरांऐवजी धनदांडगे व्यापारी, वकील, कारखान्याचे माजी एम.डी., निमशासकीय कर्मचारी, इन्कम टॅक्स भरणारे कामावर दाखवून मोठी रक्कम लाटल्याच्या गंभीर प्रकाराने खळबळ उडाली आहे. पैसे लाटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांनी आम्ही रोहयोच्या कामावर नव्हतोच, तसेच याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
अंबड (जि. जालना) हद्दीत येणाऱ्या बीड बायपास ते साजेगाव हा रस्ता पाचोड ग्रामपंचायतीद्वारे रोहयोतून उरकण्यात आल्याचेही कागदपत्रांवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता मजुरांऐवजी मशिनरी वापरून केला आहे, असा आरोप गोर्डे यांनी केला आहे. या रस्त्यावर कोरोना रुग्णांनी काम केल्याचे मस्टरवर दाखविण्यात आले आहे. यात सुरेश अशोक नरवडे, शिवकन्या नरवडे, विनोद नरवडे, संगीता सुरेश बडजाते, यश भुमरे हे कोरोना उपचार घेत असताना दुसरीकडे हेच रोहयोच्या कामावर दाखविण्यात आल्याचे पुढे आले आहे. इन्कम टॅक्स भरणारे पाचोडचे सिमेंट व स्टील विक्रेते सुरेश बडजाते, अशा मोठमोठ्या धनदांडग्यांच्या नावावर मजुरांचे पैसे लाटण्यात आले आहेत.
कामानंतर भरले मस्टर
पाचोड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीआधी पाचोडमध्ये रस्त्यांची कामे झाली. यानंतर हीच कामे रोहयोत दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार सुरू आहे. कामे झाल्यानंतर सध्या बोगस मास्टर भरण्याचे काम सुरू आहे. अंबड तालुका हद्दीत रोहयो काम करण्याचा प्रताप पाचोड ग्रामपंचायतीने केल्याचे गोर्डे यांचे म्हणणे आहे. रोहयोंतर्गत मजुराने स्वतः काम मागणीचे पत्र द्यावे लागते. त्यानंतर रोजगार हमीतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. मात्र, पाचोडमध्ये नियम डावलून मलिदा लुटण्यात आला आहे.
...तर कारवाई करू
रोहयोच्या कामात काही अनियमितता झाली असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. सदर मस्टरवर गावातील काही जणांचे चुकून नाव आले. मात्र, त्यांना पेमेंट दिलेले नाही. पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात रोहयोच्या माध्यमातून अनेक रस्ते करण्यात येत आहेत.
-संदीपान भुमरे, रोहयो तथा फलोत्पादनमंत्री