कोरोना रुग्ण मागवताहेत पोळी-भाजी केंद्रातून जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:04 AM2021-04-03T04:04:31+5:302021-04-03T04:04:31+5:30
शहरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. लहान- मोठ्या हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याचे सांगितल्या जात आहे. यामुळे होम आयसोलेशनमध्ये ...
शहरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. लहान- मोठ्या हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याचे सांगितल्या जात आहे. यामुळे होम आयसोलेशनमध्ये रुग्णांना रहावे लागत आहे. काही भागात अख्खे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह निघत आहे. या हे रुग्ण थेट पोळी भाजी केंद्राशी मोबाईलवर संपर्क साधून घरपोच जेवण पोहोचविण्याची ऑर्डर देत आहेत. यामुळे शहरातील पोळी-भाजी केंद्रांचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. ३ मार्चपासून जेवणाच्या पार्सलच्या ऑर्डर एवढ्या वाढल्या की, स्वयंपाक करणाऱ्या महिलांची संख्या वाढवून दोन शिफ्टनुसार कामावर बोलावले जात आहे. एवढेच नव्हे, तर खासगी कोरोना केंद्रातून (दवाखाने) एकाच वेळी ५० पेक्षा अधिक जेवणाच्या डब्ब्याची ऑर्डर दिली जात आहे.
पोळी- भाजी केंद्रातून दररोज ८०० पेक्षा अधिक जेवणाचे डब्बे जात आहेत. मागील मार्च महिन्यापासून तयार जेवणासाठी ऑर्डर वाढल्या आहेत. यात जुने २४ पोळी भाजी केंद्र व काही रेस्टॉरंटमधून घरपोच डब्बे पोहोचविले जात आहेत. शिवाय, लग्नसराई कमी असल्याने १५ च्या जवळपास केटरिंग व्यवसायिकांनी आता जेवणाचे पार्सल पोहोचविण्याचे रिटेल काउंटर सुरू करीत या व्यवसात उडी घेतली आहे. यामुळे जवळपास १५० महिला व पुरुषांच्या हाताला काम मिळाले आहे.
चौकट
मागील कोरोना रुग्णावर दवाखान्यात उपचार केले जात होते. आता कोरोना रुग्णावर घरीच उपचार केले जात आहेत. यामुळे मार्च महिन्यापासून घरपोच जेवण पार्सलच्या ऑर्डर वाढल्या आहेत. मागील वर्षी १० दिवसांचा लॉकडाऊन शहरात करण्यात आला होता. त्या काळात कामगारांसाठी कंपन्यांमधून जेवण पार्सलच्या ऑर्डर येत होत्या. सध्या ६० टक्के पार्सल ऑर्डर घरी असलेल्या रुग्णांना ते ४० टक्के पार्सलच्या ऑर्डर खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून येत आहेत. एका रुग्णाची १० दिवसांची ऑर्डर असते. काही रुग्ण घरी गेल्यानंतर पुढील १० दिवस पार्सल मागवितात. युज अँड थ्रो प्लास्टिकच्या डब्ब्यातून जेवण दिले जाते.
रवींद्र मोदी
ज्येष्ठ व्यावसायिक, पोळी- भाजी केंद्र