अंबाजोगाईत कोरोना रुग्ण वाढले, पण ठेवायचे कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 07:17 PM2021-03-10T19:17:06+5:302021-03-10T19:22:46+5:30

corona virus प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १० मार्च ते १३ मार्च या कालावधीत अंबाजोगाईत व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट करण्याची मोहिम शासनाच्या वतीने सुरू झाली आहे.

Corona patients grew in Ambajogai, but where to keep? | अंबाजोगाईत कोरोना रुग्ण वाढले, पण ठेवायचे कुठे ?

अंबाजोगाईत कोरोना रुग्ण वाढले, पण ठेवायचे कुठे ?

googlenewsNext
ठळक मुद्देअंबाजोगाईत व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट सुरू झाल्यापॉझिटीव्ह निघणाऱ्या रुग्णांना बेडच नाहीत

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई -  शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट बुधवारपासून सुरू केल्या. टेस्ट सुरू होताच पॉझिटीव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. मात्र, कोविड रुग्णालयात अपुरे बेडस् असल्याने या नवीन रुग्णांना ठेवायचे कुठे? असा प्रश्न रुग्णालया प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. 

प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १० मार्च ते १३ मार्च या कालावधीत अंबाजोगाईत व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट करण्याची मोहिम शासनाच्या वतीने सुरू झाली आहे. अंबाजोगाई शहरात पहिल्या टप्प्यात जवळपास ३१९४ व्यापाऱ्यांच्या अँटीजन तपासण्या होणार आहेत. बुधवारी पहिल्याच दिवशी मंडी बाजार येथील नागरी रुग्णालय व शिवाजी चौक परिसरातील जिल्हा परिषद शाळा या दोन ठिकाणी तपासण्या सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी २७१ व्यापाऱ्यांच्या तपासण्या झाल्या. यात २८ व्यापारी कोरोना पॉझिटीव्ह निघाले. कोरोना पॉझिटीव्ह निघालेल्या व्यापाऱ्यांमध्ये जे गंभीर आजाराचे रुग्ण आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे नित्याचे ठरते. मात्र, लोखंडी सावरगाव येथे असणाऱ्या कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ ३० बेड उपलब्ध आहेत. ३० बेड उपलब्ध असतांनाही तिथे जवळपास ४५ रुग्णांवर उपचार सुरू असतात. 

शासनाने दोन महिन्याखाली लोखंडी सावरगाव येथील कोविड हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग कमी केला. आता केवळ ३० रुग्णांना लागणारा कर्मचारी वर्ग रुग्णालयात उपलब्ध आहे. अशी स्थिती असतांनाही ४५ ते ५० रुग्णांवर उपचार होतात. मात्र, अचानकच मोठ्या प्रमाणात टेस्ट सुरू झाल्याने वाढणाऱ्या रुग्णांना ठेवायचे कुठे? असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. अंबाजोगाई शहरात स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड हॉस्पटल या दोन ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातात.  स्वा. रा. ती. रुग्णालयात अतिगंभीर रुग्णावर उपचार होतात. तर साधारण रुग्णांवर लोखंडी सावरगावच्या रुग्णालयात उपचार होतात. गेल्या दोन महिन्यांपासून अंबाजोगाई तालुक्यातील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयातील बेड अगोदरच आरक्षित झालेले आहेत.लोखंडी सावरगावचे कोविड रुग्णालय एक हजार रुग्ण क्षमतेचे आहे. मात्र, इथे कर्मचारी वर्ग नसल्याने केवळ ३० बेडवरच रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. 

सफाईसाठी केवळ तीन कर्मचारी
लोखंडी सावरगाव येथे कोविड रुग्णालयात स्वच्छतेबाबत नेहमी ओरड होते. पन्नासच्या जवळपास रुग्ण उपचार घेत असले तरी केवळ तीन कर्मचारी स्वच्छतेसाठी असल्याने मोठा ताण या कर्मचाºयांवर येतो. दोन मजली रुग्णालयाची स्वच्छता  तीन कर्मचाºयांच्या जीवावर करायची कशी? अशी स्थिती या रुग्णालयात आहे. इतरही कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने आरोग्य सेवेत मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

आॅक्सिजन प्लँट तांत्रिक कारणामुळे बंद
लोखंडी सावरगावच्या रुग्णालयाला आॅक्सिजन प्लँट मंजूर झाला. लाखो रुपये खर्च करून हा प्लँट तयार करण्यात आला. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना आॅक्सिजनची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे या प्लँटची निर्मिती  झाली. एवढा प्लँट तयार होऊनही केवळ तांत्रिक कारणामुळे तो बंद आहे. हा प्लँट सुरू झाला तर येथील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.

Web Title: Corona patients grew in Ambajogai, but where to keep?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.