मराठवाड्यात कोरोना एक्स्प्रेस सुसाट; चार दिवसांत तीन हजार कोरोना रुग्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 12:50 PM2022-01-13T12:50:57+5:302022-01-13T12:53:37+5:30
Corona Virus: गेल्या चार दिवसांत विभागात तब्बल ३१३७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांत विभागात तब्बल ३१३७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यात सर्वाधिक रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. त्याखाली लातूर, नांदेड या जिल्ह्यांचा क्रमांक आहे. इतर जिल्ह्यांतही कमी अधिक प्रमाणात रुग्ण वाढत आहेत.
विभागात १ जानेवारीला ६६ रुग्ण होते. त्यात औरंगाबाद १८ व लातूरमध्ये प्रत्येकी १८ रुग्णांचा समावेश होता, तर २ जानेवारीला विभागात नव्याने १०८ रुग्णांची यात भर पडली. यात ९ जानेवारीला विभागात ५५३ बाधित रुग्ण आढळले, तर १० जानेवारीला ६६९ रुग्ण आढळले असून, ११ जानेवारीला ८६२, तर १२ जानेवारीला सकाळी नऊ वाजेपर्यंत १ हजार ५३ बाधित रुग्ण मराठवाड्यात आढळले. गेल्या चार दिवसांत एकूण ३ हजार १३७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक म्हणजे १ हजार ६२ रुग्ण हे औरंगाबादेत आहेत. लातूर जिल्ह्यात ५९३ आणि नांदेड जिल्ह्यात ५६३ रुग्ण आढळून आले आहेत. १२ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत औरंगाबादेत ४८४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.
रुग्ण संख्या ९ ते १२ जानेवारीपर्यंत
जिल्हा - बाधित रुग्ण संख्या
औरंगाबाद - १०६२
जालना - २३३
परभणी - २२७
हिंगोली - ५५
नांदेड - ५६३
बीड - ११३
लातूर - ५९३
उस्मानाबाद - २९१
एकूण - ३१३७