कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खूप वाढले ; पप्पा तुम्ही काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:02 AM2021-04-24T04:02:06+5:302021-04-24T04:02:06+5:30

बापू सोळुंके औरंगाबाद: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना बारा तास नाकाबंदी करावी लागते. काम ...

Corona positive patients increased greatly; Dad you take care | कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खूप वाढले ; पप्पा तुम्ही काळजी घ्या

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खूप वाढले ; पप्पा तुम्ही काळजी घ्या

googlenewsNext

बापू सोळुंके

औरंगाबाद: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना बारा तास नाकाबंदी करावी लागते. काम करीत असताना अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी कोरोनाचे शिकार होत आहेत. या भयावह स्थितीत कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या पोलिसांना पप्पा काळजी घ्या, मास्क काढू नका, अशी आर्त विनंती त्यांची लहान मुले करताना दिसत आहेत.

औरंगाबाद शहरात रोज सुमारे ६०० ते ७०० कोरोना बाधितांची भर पडत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यापूर्वी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर आहेत. आताही दिवसरात्र शहरातील ५९ पॉईंटवर पोलिसांना नाकाबंदी करावी लागते. ही नाकाबंदी करीत असताना पोलिसांनाही कोरोनाची बाधा होत आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील शेकडो अधिकारी, कर्मचारी कोरोना संक्रमित झाले. यापैकी काहींना आपल्या प्राणास मुकावे लागले. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात पोलिसांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली; मात्र अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नाही. लसीकरणानंतरही कोरोना बाधित होण्याच्या घटना घडत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरातील सर्व रुग्णालये भरली. ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा निर्माण झाला. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाइकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्या पोलीस बाबाला कोरोना बाधा होईल, या विचाराने त्यांची अल्पवयीन मुले- मुली चिंता व्यक्त करीत आहेत. यामुळे कामावर निघालेल्या वडिलांना ते ‘बाबा मास्क काढू नका, सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा’, असे सांगतात.

काय म्हणतात पोलिसांची मुले

बाहेर जा, पण काळजी घ्या

कोरोनामुळे एवढे लोक पॉझिटिव्ह झाले, अमुक व्यक्तीचे निधन झाले, अशा थरकाप उडविणाऱ्या बातम्या वाचायला आणि टीव्हीवर पाहायला मिळतात. माझे पप्पा बारा तास कामावर असतात. तेव्हा त्यांची काळजी वाटते. घराबाहेर पडताना मास्क कधीही उतरू नये, मी त्यांना सांगतो. तसेच सॅनिटायझर सोबत आहे अथवा नाही, हेदेखील विचारतो.

मोहम्मद साकीब खान (वय १४ )

ते घराबाहेर असल्यावर खूप काळजी वाटते

माझे पप्पा फौजदार आहेत. ड्युटीवर असताना ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि उपचार घेऊन बरेही झाले. त्यांना पुन्हा कोरोनाची बाधा होऊ नये, याकरिता नाका-तोंडाला लावलेला मास्क खाली घेऊ नका, असे मी त्यांना सांगते. ते घराबाहेर असल्यावर त्यांची खूप काळजी वाटते.

- मंजुश्री रतन डोईफोडे.(वय ११)

मास्क घालूनच काम करावे

पोलीस असल्यामुळे पप्पाचा लोकांशी संपर्क येतो. अशा वेळी त्यांची काळजी वाटते; मात्र काम करताना त्यांनी गर्दीत जाऊ नये. गर्दीत गेल्यामुळे कोरोनाची बाधा होण्याचा धोका असतो. यामुळे शक्यतो पप्पांनी एकटेच रहावे आणि मास्क घालूनच काम करावे, असे मी त्यांना सांगते.

दाक्षायणी संतोष मुदीराज (वय १३)

त्यांनी घरीच रहावे, असे वाटते

कोरोना संपेपर्यंत पप्पाने घरीच रहावे, त्यांनी घराबाहेर जाऊच नये, असे वाटते. त्यांना काही व्हायला नको, याची आम्हाला चिंता सतावते.

- साईराज मुदीराज (वय १०)

Web Title: Corona positive patients increased greatly; Dad you take care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.