७० लाखांसाठी खून करून कोरोनाने मृत्यू भासवला; दोन वर्षांनी भागीदारांवर गुन्हा दाखल
By राम शिनगारे | Published: May 10, 2023 08:08 PM2023-05-10T20:08:24+5:302023-05-10T20:08:48+5:30
व्यवसाय भागिदारीतील ७० लाख रुपये हडपण्यासाठी केला खून
छत्रपती संभाजीनगर : भागिदारीत व्यवसाय सुरू केल्यानंतर ७० लाख रुपये हडपण्यासाठी बडतर्फ पोलिस कर्मचारी देविदस विश्वनाथ इंदाेरे (रा. ढिंबरगल्ली, बेगमपुरा) यांचे अपहरण करून खून केला. त्यानंतर कोरोनाने मृत्यू झाल्याचे दाखविले. हा प्रकार एप्रिल २०२१ मध्ये घडला होता. पोलिसांनी मृताच्या पत्नीच्या तक्रारीची दखल घेतली नाही. शेवटी न्यायालयाच्या आदेशाने ८ मे रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दहा जणांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदविला.
मृताची पत्नी वर्षा इंदोरे यांच्या फिर्यादीनुसार देविदास हे २००२ मध्ये शहर पोलिस दलात भरती झाले. त्यांना एका न्यायालयीन प्रकरणात बडतर्फ केले होते. त्यानंतर देविदासने जवळची सर्व जमापुंजी एकत्र करून अशोक शिंगारे पाटील याच्यासोबत भागिदारीमध्ये अंमळनेर येथील खासगी कंपनी चालविण्यासाठी घेतली. ९ एप्रिल २०२१ रोजी इंदोरे कुटुंबिय घरी असताना पंकज बत्तीशे देविदासला सोबत घेऊन विद्यापीठ मैदानाकडे गेला. त्याठिकाणी आरोपींनी त्यास मारहाण करून त्याला रिक्षात कोंबून घेऊन गेले. रात्री ९ वाजता देविदासचा पत्नीला फोन आला. त्यांनी शिंगारे काेऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेत असल्याचे सांगून तो पैसे बुडविण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. तेव्हा गोड बोलून सुटका करून घ्या, असे पत्नीने सुचविले. त्यानंतर देविदासला तिरुपती हॉस्पिटल, एमआयडीसी वाळूज येथे भरती केल्याचे फोनवरून पत्नीला सांगितले.
तेव्हा सर्व नातेवाईक दवाखान्यात गेले. त्याठिकाणी देविदासला कोरोना झाल्याचे सांगून नातेवाईकांना भेटू दिले नाही. शेवटी पत्नी वर्षा तिसऱ्या दिवशी भेटल्या. तेव्हा देविदासने शिंगारेने धोका दिल्याचे सांगितले. ११ एप्रिल २०२१ रोजी देविदासला घाटीत हलविले. त्याठिकाणी १२ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. शेवटी दोन वर्षांनी न्यायालयाच्या आदेशाने खूनाचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल बोडखे करीत आहेत.
यांचा आरोपींमध्ये समावेश
अशोक कारभारी शिंगारे पाटील (रा. मोरे चौक, एमआयडीसी वाळूज), सुभाष हरिभाऊ निकम पाटील (रा. साजापूर), पंकज जगदीश बत्तीशे (रा. शांतीपुरा, छावणी), संतोष जगन्नाथ पंडुरे (रा. नेवासा), बंडू बाळचंद इंदोरे (रा. पहाडसिंगपुरा), उमेश हजारे, किशोर गायकवाड (दोघे रा. वाळूज), भारत गाेरे, देशपांडे आणि उत्तम राठोड (तिघे रा. एमआयडीसी वाळूज) अशी आरोपींची नावे आहेत.