कोरोना तपासणीत राज्यात घाटीतील प्रयोगशाळा पहिल्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:06 AM2021-04-23T04:06:01+5:302021-04-23T04:06:01+5:30
औरंगाबाद : कोरोना तपासणीत राज्यातील शासकीय प्रयोगशाळांमध्ये सर्वाधिक आरटीपीसीआर तपासण्या करण्यामध्ये औरंगाबादेतील घाटी रुग्णालातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा ...
औरंगाबाद : कोरोना तपासणीत राज्यातील शासकीय प्रयोगशाळांमध्ये सर्वाधिक आरटीपीसीआर तपासण्या करण्यामध्ये औरंगाबादेतील घाटी रुग्णालातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) पहिल्या क्रमाकांवर आहे. या प्रयोगशाळेने आतापर्यंत तब्बल ३ लाख ९ हजार ७८८ तपासण्या केल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या प्रारंभी कोरोनाच्या निदानासाठी पुण्यातील ‘एनआयव्ही’ अवलंबून राहावे लागत होते. या ‘एनआयव्ही’लाही घाटीतील प्रयोगशाळेने मागे टाकले आहे.
सर्वाधिक आरटीपीआर तपासण्या करणाऱ्या राज्यातील २५ शासकीय प्रयोगशाळांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. या यादीत घाटीतील प्रयोगशाळा पहिल्या क्रमांकावर आहे. घाटीत २९ मार्च २०२० रोजी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र कार्यान्वित झाले आणि जिल्ह्यातच कोरोनाचे निदान होण्याची सुविधा सुरू झाली. यासाठी अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे यांनी परिश्रम घेतले.
२९ मार्च २०२० रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल एक संशयित आणि खाजगी रुग्णालातील एक संशयित, अशा दोघांचे स्वॅब घाटीत सर्वप्रथम दाखल झाले होते. पूर्वी रोज २०० तपासण्या करण्याची क्षमता होती. ही क्षमता आता २ हजारांवर गेली आहे आणि लवकरच रोज ३ हजार तपासण्यांची क्षमता होणार असल्याचे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर कोरोना आहे की नाही, याचे निदान होण्यासाठी रुग्णांचे स्वॅब पुणे येथील ‘एनआयव्ही’ला पाठवावे लागत होते. तेव्हा त्याचा अहवाल येण्यासाठी २ ते ३ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असते; परंतु घाटीत तपासणीची सुविधा सुरू झाल्यानंतर काही तासांमध्ये अहवाल मिळणे सुरू झाले.
क्षमता आणखी वाढणार
गतवर्षी मार्चमध्ये प्रयोगशाळा सुरू केली. पाहता पाहता तेथील यंत्रसामुग्री, मनुष्यबळ वाढले. सुरुवातील २०० टेस्ट होत असत. सध्या १,८०० ते २ हजारांपर्यंत तपासण्या होत आहेत. ही क्षमता लवकरच ३ हजारांपर्यंत जाणार आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे आणि त्यांच्या विभागाच्या अथक प्रयत्नांनी हे शक्य झाले. प्रयोगशाळेसाठी जिल्हा प्रशासनाची मोठी मदत झाली.
-डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी
----
विद्यापीठातील प्रयोगशाळा १४ व्या क्रमाकांवर
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळा १४ व्या क्रमाकांवर आहे. याठिकाणी आतापर्यंत १ लाख ६५ हजार ७७९ आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबादेत दोन प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाचे निदान होत आहे.
-----
आरटीपीसीआर तपासणीची स्थिती
प्रयोगशाळा- एकूण तपासण्या
१) घाटी, औरंगाबाद- ३,०९,७८८
२) एनआयव्ही, पुणे- ३,०२,७८८
३) बीजेजीएमसी, पुणे- २,९९,८८०
४) आरसीएसएम जीएमसी कोल्हापूर- २,७६,९१२
५) एमएमटीएच, नवी मुंबई- २,६९,१४०