कोरोना वाॅर्डाच्या आवारातच कोरोना नियमांची ऐशीतैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:02 AM2021-06-04T04:02:02+5:302021-06-04T04:02:02+5:30
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सचे पालन, गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. परंतु ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर ...
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सचे पालन, गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. परंतु ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार होत आहे, त्या घाटीतील मेडिसीन विभागातच कोरोना नियमांची ऐशीतैशी झाल्याचे गुरुवारी पहायला मिळाले. सोशल डिस्टन्स विसरून एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी घाटीबाहेरच्या व्यक्तींनाही थेट मेडिसीन विभागात प्रवेश देण्यात आला. वाढदिवस साजरा करताना अनेक जण विनामास्क होते, ही सर्वाधिक धक्कादायक बाब आहे.
घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी कर्मचारी आणि रुग्णांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश मिळता कामा नये, यासाठी प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. परंतु सुरक्षारक्षक केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची स्थिती गुरुवारी याठिकाणी साजऱ्या झालेल्या वाढदिवसावरून पहायला मिळाली. जवळपास २० जणांच्या घोळक्यात कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी फुलांची उधळण करण्यात आली. फुलांच्या पाकळ्यांचा खच याठिकाणी पडून होता. याविषयी मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मिनाक्षी भट्टाचार्य यांना विचारले असता, हा प्रकार कळला असून, याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटन न झालेल्या वाॅर्डाला पुष्पहार
मेडिसीन विभागासमोर जुन्या वाॅर्ड क्रमांक-४ चे नूतनीकरण करण्यात आले आहे. वाॅर्डाचे उद्घाटन अद्याप झालेले नाही. वाढदिवसानंतर या वाॅर्डाच्या प्रवेशद्वाराला कर्मचाऱ्याच्या गळ्यातील पुष्पहार पहायला मिळाला.
फोटो ओळ....
१)मेडिसीन विभागात अशाप्रकारे कोरोना नियम पायदळी तुडवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
२)या वाॅर्डाच्या प्रवेशद्वाराला कर्मचाऱ्याच्या गळ्यातील पुष्पहार.