कोरोनाची धडकी; यंदा धोंडे खायला जावयांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 12:12 PM2020-09-09T12:12:49+5:302020-09-09T12:45:45+5:30
दर तीन वर्षांनी येणारा धोंड्याच्या महिना यंदा १८ सप्टेंबरपासून सुरुवात होऊन १८ ऑक्टोबरला संपणार आहे.
औरंगाबाद : अधिक मासाची (धोंडा) जावयांच्या जमातीला आतुरतेने प्रतीक्षा असते. सासुरवाडीला जावयांचा नेहमीच स्वागत, सन्मान तर होतोच; पण अधिक मासातील सन्मान जरा हटकेच असतो. मुलगी व जावयांची लक्ष्मी-नारायण स्वरूपात पूजा होते. चविष्ट धोंडे खाऊ घातले जातात. लेक-जावयांची खूप इच्छा आहे येण्याची; पण कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने धडकी भरलेल्या परजिल्हा, परराज्यांतील जावई औरंगाबादमध्ये येण्यास नकार कळवत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २०, १७६ रूग्ण बरे झाले आहेत. #coronavirus#aurangabadhttps://t.co/pO4HETFyM8
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 9, 2020
दर तीन वर्षांनी येणारा धोंड्याच्या महिना यंदा १८ सप्टेंबरपासून सुरुवात होऊन १८ ऑक्टोबरला संपणार आहे. अधिक मासात विविध धार्मिक कार्ये केली जातात. विशेषत: या काळात लेक-जावयांना मोठा मान असतो. अधिक मासात लक्ष्मी व नारायणाची आराधना केली जाते. लेक-जावयाची लक्ष्मी- नारायण स्वरूपात पूजा केली जाते. त्यासाठी दोघांना खास आमंत्रण दिले जाते. त्यांची पूजा करतात. ३३ अनारसे, बत्तासे, नारळ, सुपाऱ्या देतात. ते सर्व चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटामध्ये ठेऊन दिवा व कुंकू लावून हे दान दिले जाते. पुरणाचा धोंडा केला जातो. काही जण हौशीने चांदी किंवा सोन्याचे धोंडेसुद्धा जावयाला देतात. साडी, कपड्यांची शेवंती सुद्धा देतात. धोंड्याचे हे महत्त्व असल्याने जावईबापू सासरी येतातच. मात्र, यंदा औरंगाबादमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व परजिल्ह्यातून आल्यावर १० दिवस विलगीकरणात राहावे लागू शकते. यंदा जावईबापूंनी येत नसल्यान आता काय करावे, असा प्रश्न सासू-सासऱ्यांना पडला आहे. काहींनी धोंड्याच्या दानाची रक्कम थेट जावयांच्या बँक खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला. ज्यांचे जावई शहरातच राहतात त्यांना धोंडा मिळणार आहे. यानिमित्ताने लेक, जावई, नातवंडे सारे येतात. यंदा मात्र, हे चित्र नाही.
१६० वर्षांनी आश्विन मासात आला अधिक मास
दर ३ वर्षांनी येणारा अधिक मास यंदा १६० वर्षांनंतर आश्विन मासात आला आहे. यापूर्वी २ सप्टेंबर १८६० मध्ये आश्विन मासात अधिक मास आला होता. अधिक मासात घरीच लक्ष्मी-नारायणाची आराधना करावी, अधिक मास माहात्म्य वाचावे, नारायण कवच, नारायण अस्त्र व विष्णुसहस्रनामाचे वाचन करावे.
- वे.शा.सं. देवीदास मुळे गुरुजी