कोरोना, मोबाइलवेडाने उडविली झोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:02 AM2021-06-28T04:02:01+5:302021-06-28T04:02:01+5:30
-मनोविकारतज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांत ७० टक्के निद्रानाशाचेे रुग्ण योगेश पायघन औरंगाबाद : गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेले कोरोनाचे थैमान, लाॅकडाऊनमुळे ...
-मनोविकारतज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांत ७० टक्के निद्रानाशाचेे रुग्ण
योगेश पायघन
औरंगाबाद : गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेले कोरोनाचे थैमान, लाॅकडाऊनमुळे जीवनशैलीत झालेले बदल, एकाच ठिकाणी राहण्यामुळे कमी झालेले शारीरिक श्रम आणि मोबाइलचा अतिवापर यामुळे माणूस तणावाखाली आला आहे. अनेकांना निद्रानाशाच्या समस्यांनी घेरले असून, अनेक जण मनोविकारतज्ज्ञांकडे धाव घेत आहेत. असे ७० टक्के लोक झोप लागत नाही, झोप उडाल्याचे सांगत असल्याचे तज्ज्ञांनी निरीक्षण नोंदवले आहे.
पूर्वी लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, असा मंत्र देत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असायची. मात्र, आता मोबाइल, टीव्ही पाहण्याच्या छंदात आणि कोरोनाच्या सतावणाऱ्या चिंतेने अनेकांची झोप उडाली आहे. लाॅकडाऊनमुळे घरातच थांबावे लागत आहे. बाहेर मनोरंजनाची साधने बंद आहेत किंवा प्रतिबंध असल्याने हातातील मोबाइलच सध्या विरंगुळ्याचे मुख्य साधन बनल्याचे चित्र आहे. मुलांचाही ऑनलाइन शिक्षणामुळे स्क्रीन टायमिंग वाढला आहे. बहुतेक वृद्धापकाळात जाणावणाऱ्या निद्रानाशाची समस्या तरुणाईसोबत शाळकरी विद्यार्थ्यांतही जाणवत आहे. उडालेल्या झोपेमुळे इतर आरोग्य समस्यांनाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. साधारण रात्रीच्या वेळी शांत ठिकाणी, अंधारात किंवा डोळ्यावर काळ्या कपड्याची झापड ठेवून साधारण ८ सात झोप सर्वांना गरजेची असते. त्यातील १० टक्के लोकांना ९ ते १० तास झोप लागू शकते, तर १० टक्के लोकांना ६ ते ८ तास झोपेची आवश्यकता असते. मात्र, बदललेली जीवनशैली, ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओ पाहण्याच्या आहारी गेल्याने एकलकोंडेपणा वाढून त्याचा एकाग्रतेवर परिमाण होत असल्याने झोप उडाल्याचेही दिसत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
----
झोप का उडते?
१. फिनियल ग्लॅण्डमधून मेलॅटोनीन नावाचे संप्रेरक (हार्मोन्स) अंधारात तयार होते. ते रात्री झोपण्यासाठी तर दिवसा जागविण्यात महत्त्वाची भूमिका निभावते. मोबाइल, टीव्हीचा प्रकाश या प्रक्रियेत अडथळा निर्माण करते. मोबाइलचा रात्री झोपेपूर्वीचा अतिवापर वाढल्याने मेंदूचे कार्य बिघडत आहे.
२. उशिरा झोपल्याने सकाळी उठायला उशीर होतो. शांत व अंधाऱ्या वातावरणात न झोपल्याने सकाळी त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसाच्या वेळापत्राकवर होतो. दिवसभर चिडचिड होते. कामात लक्ष लागत नाही. मन उदास राहिल्याने उत्साह राहत नाही.
३. रात्री मोबाइलवर थ्रिलर, हाॅरर दृश्य पाहणे, चित्रपट, वेबसिरीज, व्हिडिओ पाहिल्याने भयानक स्वप्न पडतात. थोड्या थोड्या वेळाने जाग येते. त्यामुळे झोप खंडित होते.
४. बेवसिरीज पाहण्याचेही अनेकांना व्यसन दिसून येते. वेबसिरीज एकदा पाहायला घेतल्यावर रात्र कधी जाते कळत नाही, गेम्समुळेही तसेच होते. त्यामुळे दुपारी झोप घेतल्याने रात्री झोप लागत नाही. परिणामी, झोपेचे चक्र बिघडते.
---
झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम
-चिडचिडेपणा वाढून निद्रानाशाची समस्या उद्भवते
-मुले, तरुणाईच्या जडणघडणीवर परिणाम होतो
-एकलपणा वाढून कामातील एकाग्रता कमी होतेय
-मानसिक ताणतणाव, व्यसन व मानसिक आजार जडतात
---
नेमकी झोप किती हवी ?
--
नवजात बाळ - १६ ते १८ तास
एक ते पाच वर्ष - १० ते १२ तास
शाळेत जाणारी मुले - ८ ते १० तास
२१ ते ४० वयोगट - ७ ते ९ तास
४१ ते ६० - ७ ते ८ तास
६१ पेक्षा जास्त - ६ ते ८ तास
----
-झोपेचे निश्चित वेळापत्रक नियमित फाॅलो करा
-दिवसभरात अर्ध्या तासापेक्षा अधिक झोप नको
-बेडवर वाचन, मोबाइल, लॅपटाॅप, टीव्ही पाहणे टाळा
-झोपेच्या चार तासांपूर्वी व्यसन करू नये, उत्तेजक पेय घेऊ नये, मसालेदार पदार्थ खाऊ नये
--
डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको
--
-झोपेच्या गोळ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाहीत. झोपेच्या गोळ्या खाण्याचे प्रमाण अधिक नाही. मात्र, डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या गोळ्या खाऊ नयेत.
-झोप यावी म्हणून व्यसन, उत्तेजक पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नैसर्गिक झोपेसाठी व्यायाम, संतुलित आहार, स्लिप हायजीनचे पालन गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-----
ओपीडीत येणाऱ्या ७० टक्के रुग्णांना झोप येत नाही, अशी ओरड असते. निदानानंतर त्याविषयीची कारणमीमांसा होते. त्यात मानसिक ताणतणाव, व्यसन व मानसिक आजार आढळून येतात. कोरोनात प्रामुख्याने घरात राहून कंटाळण्यातून मोबाइलचा वाढलेला वापर, ताणतणाव वाढल्याने निद्रानाशाचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरातील क्षीण घालवण्यासाठी, रिफ्रेश होण्यासाठी शांत व पुरेशी झोप आवश्यक आहे.
-डाॅ. प्रदीप देशमुख, सहायक प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र विभाग, घाटी रुग्णालय
..............
अर्धातास तरी चिंतन करा
जवळच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संभाषण, मोकळ्या वेळेत फिरायला जाणे आणि नियमित व्यायाम हवा. दिवसातून अर्धातास तरी स्वत: चिंतन करा. कुठलेही व्यसन टाळा. ताणतणाव वाढलेला आहे. व्यसनाधीनता, मोबाइलचा वाढलेला वापर, उत्तेजक पदार्थांचे सेवन आदी घटक झोपेवर परिमाण करतात. त्यामुळे स्लिप हायजीनचे नियम पाळले पाहिजेत.
-डाॅ. किरण बोडखे, मनोविकारतज्ज्ञ