कोरोनाने घेतला मामा-मामीचा बळी, जेवणाचा डबा घेऊन जाणारा भाचाही अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:05 AM2021-04-20T04:05:36+5:302021-04-20T04:05:36+5:30
पाचोड : पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा येथील प्राध्यापक पती व पत्नीचा कोरोनाने दहा दिवसांच्या कालावधीत मृत्यू झाला. त्यांच्या उपचाराच्या ...
पाचोड : पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा येथील प्राध्यापक पती व पत्नीचा कोरोनाने दहा दिवसांच्या कालावधीत मृत्यू झाला. त्यांच्या उपचाराच्या काळात दवाखान्यात जेवणाचा डबा ने-आण करणाऱ्या भाचाचाही अपघाती मृत्यू झाला. अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत मामा-मामीचा कोरोनाने बळी गेला. तर त्यांच्या मदतीसाठी धावलेल्या भाच्याचाही मृत्यू झाल्याने या घटनेने गेवराई मर्दा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेवराई मर्दा येथील प्राध्यापक हनीफखॉ पठाण (४९) हे विवेकानंद शिक्षण संस्था, रोहिलागडच्या महाविद्यालयात कार्यरत होते. फ्रीजचे पाणी पिल्याने प्रा. हनीफखॉ पठाण व पत्नी शबाना बानू पठाण (४४) हे आजारी पडले. उपचारासाठी जालना येथील एका खासगी रुग्णालयात ते दाखल झाले. उपचारादरम्यान ९ एप्रिलला शबाना बानू पठाण यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूची माहिती प्राध्यापकांना न देता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा भाचा रियाज पठाण (३२) मामासाठी जेवणाचा डबा घेऊन जात असे. मामीच्या अंत्यविधीचा कार्यक्रमही त्याच्या उपस्थितीत झाला. रविवारी (दि.११) रियाज गेवराई येथून मामासाठी जालन्याला दुचाकीने जेवणाचा डबा घेऊन जात होता. यादरम्यान त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने घडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. दोन दिवसाच्या कालावधीत दोन जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दुसरीकडे जालन्यातील रुग्णालयात प्रा. हनीफखॉ पठाण यांच्यावर उपचार सुरू होते. पत्नी आणि भाचा यांच्या मृत्यूची माहिती त्यांना कळविण्यात आली नाही. शुक्रवारी (दि.१७) त्यांची प्रकृती अस्थिर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादेत दाखल केले गेले. मात्र, सोमवारी (दि.१९) सकाळी प्रा. हनीफखॉ यांनी देखील देह सोडला. दहा दिवसांत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे गेवराई मर्दा गावात शोककळा पसरली.
----- पाचोड परिसरात मृत्यूचे तांडव सुरूच -----
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाचोडसह परिसरातील गावांत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरा दिवसांत पाचोड खुर्द, थेरगाव, केकत जळगाव, पाचोड बु, हार्षी, वडजी येथील दहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पाचोड भागात मृत्यूचे तांडव सुरू असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.