कोरोनाने शिकविला जगण्याचा नवा धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:05 AM2020-12-31T04:05:16+5:302020-12-31T04:05:16+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : वर्षभरापूर्वी महाभयंकर अशा कोरोनाने प्रवेश केला आणि एकच हाहाकार माजविला. अनेकांचे आयुष्य या महारोगाने उद्ध्वस्त ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : वर्षभरापूर्वी महाभयंकर अशा कोरोनाने प्रवेश केला आणि एकच हाहाकार माजविला. अनेकांचे आयुष्य या महारोगाने उद्ध्वस्त केले, जवळच्या व्यक्तींना हिरावून घेतले. आजाराची अन् मृत्यूच्या भीतीची धडधड प्रत्येकाच्या मनात सुरू झाली. पण त्यातूनच जगण्याचा नवा धडाही कोरोनाने शिकविला. आयुष्यात आरोग्याला अग्रक्रम आला. तर या काळात आर्थिक संकटाने काटकसर, बचतीची सवयही लावली.
वर्ष २०२० या संपूर्ण वर्षात कोरोनाचा प्रभाव राहिला. आरोग्यावर तर परिणाम झालाच, पण अनेक बाबतीत फटका बसला. लॉकडाऊन लागल्यानंतर अनेकांचा व्यवसाय बुडाला, तर अनेकांच्या पगाराला कात्री लागली. त्यामुळे महिन्याचे बजेटच कोसळले. इतके वर्ष केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींच्या खर्चासाठी हात आखडता घेण्याची सवय अंगवळणी पडली. रुग्णालयात जावे लागले तर...असा विचार करून आरोग्यासाठी प्राधान्याने बचत आणि गुंतवणूक करण्यावर भर दिला जाऊ लागला. अनेकांच्या नाेकरीवरही गदा आली. त्यामुळे नव्याने सुरुवात करण्यासही कोरोनाने भाग पाडले.
मास्क, हाताच्या स्वच्छतेची लागली शिस्त...
कोणताही आजार होण्यासाठी अस्वच्छता कुठेतरी कारणीभूत असते. कोराेनानेही हेच शिकविले. त्यामुळे स्वच्छतेचेही महत्त्व वाढले. घराबाहेर पडताना मास्क घालण्याची सवय लागली. घर, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर, साबणाने हात स्वच्छ करण्याची शिस्तच लावली.
कुटुंबाला वेळ, खटके, मानसिक परिणाम...
कोरोनापूर्वी नोकरी, व्यवसायामुळे धावपळीच्या जीवनशैलीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना वेळ देणे, त्यांच्याशी गप्पा मारणे दुर्मीळच झाले होते. परंतु लॉकडाऊनमुळे घरातच थांबण्याची वेळ आली. त्यातूनच व्यक्तीला विशेषत: कुटुंब प्रमुखाला भरपूर वेळ देता आला. पण त्याच वेळी घरात खटके उडण्याचे प्रकार वाढून नात्यात दुरावा निर्माण होण्याची समस्याही वाढली. घराबाहेर पडता येत नसल्याने मानसिक प्रश्नांना अनेकांना विशेषत: वृद्धांना सामोरे जावे लागले.
घरच बनले ऑफिस...
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर अनेक उद्योग, संस्थांनी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांचे घरच ऑफिस झाले. घराबाहेर न पडता ऑनलाईन काम सुरू झाले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अशाप्रकारे काम फायदेशीर ठरत असल्याने अजूनही अनेकांकडून वर्क फ्रॉम होम कायम ठेवण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे...
कोरोनामुळे शाळा बंद राहिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे सुरू झाले. मोबाईल, संगणक, लॅपटॉपच्या मदतीने घरी बसलेल्या मुलांना शिक्षण मिळणे सुरु झाले.
देणाऱ्यांचे हात हजारो...वाढली माणुसकी...
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. परंतु म्हणतात ना ‘देणाऱ्यांचे हात हजारो...’ अगदी याच प्रमाणे संपूर्ण औरंगाबादकर गोरगरिबांसाठी सरसावले. विविध संस्था, संघटना, शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि वैयक्तिक स्वरुपात अनेकांनी गरजूंना मदत दिली. कोरोनाने सोशल डिस्टन्सच्या नावाखाली माणसाला दूर लोटले, पण त्यामुळे माणुसकी कमी तर झाली नाही, कितीतरी अधिक वाढली.
डॉक्टर देव, पण वैद्यकीय क्षेत्रात लुटीची भावना...
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि मास्क, सॅनिटायझरची मागणी वाढली. सुरुवातीला अगदी चढ्यादराने त्यांची विक्री करण्यात आली. ही अवस्था उपचाराच्या बाबतीतही घडली. खासगी रुग्णालयांत कोरोनावरील उपचार मोफत होईल, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले; मात्र शहरात प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रुग्णांकडून उपचारापोटी लाखो रुपयांकडून बिले आकारण्यात आली. त्यातही गंभीर रुग्णांना अनेक रुग्णालयांनी नाकारले. उपचार मिळण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या, तिसऱ्या रुग्णालयात भटकंती करावी लागली. त्यातून रुग्णालयाच्या दारातच रुग्णांचा मृत्यू ओढावण्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या. डॉक्टर हा देवानंतरचा देव आहे, असे आजही म्हटले जाते. परंतु कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात सर्वसामान्यांची लूट होत असल्याची भावना पाहायला मिळाली.
वैद्यकीय क्षेत्रासमोर नवे आव्हान
कोरोना काळात कोरोनासह इतर आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याचे आव्हान वैद्यकीय क्षेत्रासमोर उभे राहिले आहे. डोळे असो दंतोपचार, कोणतेही उपचार करताना कोरोनाचा संसर्ग होऊ न देता रुग्णांच्या वेदना दूर करण्यास प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विविध उपाय, खबरदारी घेतली जात आहे.