किटद्वारे घरीच कोरोना टेस्ट, ९०८ जण बनले स्वतःच डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 04:25 PM2022-02-08T16:25:03+5:302022-02-08T16:25:38+5:30

औषध प्रशासनाकडून किटच्या विक्री आणि साठ्याचा ‘हिशेब’ ठेवणे सुरू

Corona test at home with the kit, 908 people became doctors themselves! | किटद्वारे घरीच कोरोना टेस्ट, ९०८ जण बनले स्वतःच डॉक्टर!

किटद्वारे घरीच कोरोना टेस्ट, ९०८ जण बनले स्वतःच डॉक्टर!

googlenewsNext

औरंगाबाद : घरीच कोरोना टेस्ट करण्यासाठी सेल्फ टेस्टिंग किट खरेदी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. गेल्या काही दिवसांत औरंगाबादेत ९०८ किटची विक्री झाली आहे, तर आजघडीला ३७० किट औरंगाबादेत उपलब्ध आहेत.

नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड न देता शहरातील औषधी दुकानांवर सेल्फ टेस्टिंग किट अगदी सहजपणे मिळत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले होते. यासंदर्भात ‘घरीच कोरोना टेस्ट, कुणाला पत्ता नाही’ या मथळ्याखाली १७ जानेवारी रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (औषध) शहरातील विक्रेत्यांकडील किटच्या साठ्याची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार औरंगाबादेत आतापर्यंत ९०८ किटची विक्री झाल्याची माहिती समोर आली.

यंत्रणेकडून मोफत टेस्ट, मग घरी का?
आरोग्य यंत्रणेकडून कोरोना टेस्ट मोफत केली जाते. तरीही अनेक जण पैसे मोजून किट खरेदी करून तपासणी करून घेत आहेत. आपण पाॅझिटिव्ह आलो हे कोणाला कळू नये, अशा विचारातूनच किट खरेदी केली जात असल्याचे सांगितले जाते.

मराठवाड्यातील स्थिती
औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातही सेल्फ टेस्टिंग किटची विक्री सुरू आहे. मराठवाड्यात सध्या २ हजार ३२० किट उपलब्ध आहेत. ग्राहकाचे आधार कार्ड घ्यावे, मोबाईल नंबरची नोंद ठेवावी, अन्यथा कारवाईला सामाेरे जावे लागेल, असा इशारा औषधी प्रशासनाने दिला आहे.

पाॅझिटिव्ह आल्यास यंत्रणेला कळवा
सेल्फ टेस्टिंग किटच्या माध्यमातून कोरोनाची तपासणी केल्यावर पाॅझिटिव्ह आल्यास संबंधित आरोग्य यंत्रणेला कळविले पाहिजे. शहरातील औषधी वितरक आणि औषधी विक्रेत्यांकडे किती सेल्फ टेस्टिंग किट आहेत, किती विक्री झाल्यात, याचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे.
- संजय काळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषध)

Web Title: Corona test at home with the kit, 908 people became doctors themselves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.