लेखी आदेशाच्या कचाट्यात अडकली उमेदवारांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:05 AM2021-01-13T04:05:56+5:302021-01-13T04:05:56+5:30
विकास राऊत औरंगाबाद : जिल्हा आरोग्य विभागाला जिल्हा प्रशासनाकडून लेखी आदेश न मिळाल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी ...
विकास राऊत
औरंगाबाद : जिल्हा आरोग्य विभागाला जिल्हा प्रशासनाकडून लेखी आदेश न मिळाल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि दोन हजार ९० प्रभागांच्या निवडणूक मैदानात असलेल्या सुमारे ११ हजार ४९९ उमेदवारांची कोरोना चाचणीची प्रक्रिया अडकली आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यंत्रणेतील कर्मचारी उमेदवारांच्या चाचणीबाबत संबंधित यंत्रणा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या; परंतु जिल्हा आरोग्य यंत्रणेला लेखी आदेशाविना काहीही हालचाल करता आली नाही. परिणामी निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. १५ रोजी मतदान होणार असल्यामुळे १३ जानेवारी रोजी प्रचार थांबेल. उमेदवारांची संख्या पाहता तातडीने कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे होते. मात्र कोणत्याही यंत्रणेने त्याकडे लक्ष दिलेले नाही. प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असल्यामुळे हॉटेल्सवर गर्दी वाढू लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्यामुळे आजवर संसर्गापासून सुरक्षित असलेल्या ग्रामीण भागात आगामी काळात नाजूक परिस्थितीचा सामना करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. आज, सोमवारी कोरोना टेस्ट करण्याच्या अनुषंगाने लेखी आदेश निघतील असे सांगण्यात येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीवर दृष्टिक्षेप
निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायती : ६१७
मैदानात असलेले उमेदवार किती : ११४९९
एकूण प्रभागांची संख्या : २०९०
एकूण मतदान केंद्र : २२६१
निवडणुकीसाठी सरकारी कर्मचारी : ३ ते ४ हजार कर्मचारी
आतापर्यंत किती जणांच्या कोरोना टेस्ट : सोमवारी टेस्टचा होणार निर्णय
किती पॉझिटिव्ह आले आहेत : टेस्ट केली नसल्याने अहवाल नाही.
किती क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. २० मतदान केंद्रांमागे एक क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे. तर एका मतदान केंद्रावर ४ कर्मचारी असणार आहेत. ११३ क्षेत्रीय अधिकारी निवडणुकीसाठी नियुक्त केलेल आहेत. तर सुमारे २५०० इतर कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी आहेत. २२६१ मतदान केंद्रांत वैजापूर ३१५, सिल्लोड ३३६, कन्नड ३१२, पैठण ३२१, औरंगाबाद ३१६, गंगापूर २८७, फुलंब्री १७१, सोयगाव ११४, खुलताबाद ८९ केंद्रांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली जातेय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग बीडीओ आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्याने मतदानाच्या दिवशी स्क्रीनिंग करणार आहे. सॅनिटायझर आणि पल्स ऑक्सिमीटर, थर्मलगनचा वापरही पथक करणार आहे. उमेदवारी अर्ज भरणे आणि माघार घेण्याच्या दिवशी प्रत्येकाची तपासणी करण्याचे ठरले होते; परंतु गर्दी जास्त पडल्यामुळे काहीही करता आले नाही, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.